दोन वर्षांपूर्वी वाचविला होता जीव, 80 वर्षीय जेवियरसोबत सदैव राहतो कबूतर
80 वर्षीय जेवियर बॉगेट जेव्हा सायकलवरून हिंडण्यास बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्या हॅटवर बसून त्यांचा कबूतर मित्र ब्लेंकोनही सोबत जातो. वर्कशॉपमध्ये काम करत असताना ब्लेंकोनही तेथे पोहोचतो. बागेत रोपांना पाणी घालताना देखील कबूतर खांद्यावर बसून साथ देणे विसरत नाही. जेवियर यांनी हा कबूतर पाळलेला नाही तरीही आवाज दिल्यावर तो त्यांच्याकडे धावून येतो.
दोन वर्षांपूर्वी ब्लेंकोन त्यांना मिळाला होता. एका घरटय़ातून ब्लेंकोन खाली पडताना दिसला, एक मांजर त्याची शिकार करण्याच्या तयारीत होते, पण जेवियर यांनी ब्लेंकोनला उचलून घरात आणले आणि त्याच्यावर उपचार केले. पण ब्लेंकोन एक दिवस त्यांचा चांगला मित्र होईल याची कल्पना त्यांना तेव्हा नव्हती.
सुमारे दीड महिन्यापर्यंत ब्लेंकोनला दिवसातून पाचवेळा सीरिंजने अन्न भरविले. तेव्हापासून आमची मैत्री झाली. जेव्हा कधी तो मोकळा असतो, तेव्हा तो माझ्याकडे येतो, त्याला माझी साथ पसंत असावी असे जेवियर सांगतात.
शहरात सायकलने जात असताना ब्लेंकोन माझ्या डोक्यावरून बसून राहतो. त्याने स्वतःसोबत मलाही शहरात लोकप्रिय केले आहे. अनेकदा खिडकी उघडी पाहून तो माझ्या खोलीत येतो. पण यामुळे माझी पत्नी रागावत असल्याचे जेवियर म्हणाले.
माझी आणि ब्लेंकोनच्या मैत्रीचे किस्से प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केल्यापासून अनेकजण माझ्या घरी येत आहेत. ते कबूतराला पाळले आहे का विचारतात. मी त्याला घरात कैद करण्याचा प्रयत्न केला नाही. आमचे नाते परस्पर विश्वासाचे आहे. मी आवाज देताच तो येत असल्याचे ते म्हणाले.