तांत्रिक अडचणींमुळे काही स्वॅब रत्नागिरीला पाठविले : काही खासगी डॉक्टरांची सेवा कोविडसाठी अधिग्रहित
आणखी 15 पॉझिटिव्ह, 207 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ातील काही खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शनिवारी दिली. तसेच कोविड लॅबच्या तांत्रिक अडचणीमुळे ट्रूनेट मशीनवर तपासणी सुरू केली असून काही स्वॅब रत्नागिरीला पाठविण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली. दरम्यान, गेल्या पाच/सहा दिवसांपासूनचे तब्बल 1 हजार 20 कोरोना नमुने तपासणीचे प्रलंबित आहेत.
पडवे येथील खासगी लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरला परवानगी देण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. खासगी डॉक्टरांची सेवा घेताना मुख्यतः फिजिशियन्स व ऍनेस्थेशिया स्पेशालिस्ट यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हय़ात शनिवारी आणखी पंधरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाल्याची माहितीही देण्यात आली.
तसेच गृह अलगीकरणातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी पथकांची म्हणजेच रॅपिड ऍक्शन टीमची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर व कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. हे पथक रुग्णांची घरी जाऊन नियमित तपासणी करणार आहे. या गृह अलगीकरणातील रुग्णांना आरोग्य यंत्रणेमार्फत एक मेडिकल कीटही पुरविण्यात येणार आहे. त्याशिवाय जिल्हय़ातील गृह अलगीकरणातील रुग्णांसाठी जिल्हा परिषद येथे टेली मेडिसीनची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी टेली मेडिसीनसोबतच समुपदेशनाची सोयही उपलब्ध असणार आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
आणखी 15 पॉझिटिव्ह, 207 रुग्णांना डिस्चार्ज
शनिवारी आणखी 15 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर एकाच दिवशी तब्बल 207 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण 1 हजार 761 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच एकूण 58 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात 1 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
1 हजार 29 अहवालाची प्रतीक्षा
जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय कोविड लॅबमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कोरोना नमुना तपासणीला ब्रेक लागला आहे. गेल्या पाच/सहा दिवसांपासूनचे तब्बल 1 हजार 20 कोरोना नमुने तपासणीचे प्रलंबित आहेत. आता ट्रूनेट मशीनद्वारे तपासण्या करण्यास सुरुवात केली आहे. तर काही नमुने रत्नागिरीला पाठविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 22353
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 2938
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 18386
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 1029
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1119
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 58
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1761
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 8335
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12731