बालाजी मोबाईलचे संतोष शेडगे, कौस्तुभ सातपुतेंचा पुढाकार : बालाजी ब्लड बँकेचे सहकार्य : नियोजन नसताना उत्स्फूर्त प्रतिसाद : अजित साबळेंचे प्लाझमा दान
प्रतिनिधी / सातारा
‘मैं अकेला ही चला था.. मगर लोग आते गए और कारवां बनता गया’ असाच एक सुखद अनुभव शहरातील बालाजी मोबाईलचे संचालक संतोष शेडगे व कौस्तुभ सातपुते यांना आला. एखादी चांगली गोष्ट तुम्ही करत असाल तर नियोजन नसले तरी त्याला किती चांगला प्रतिसाद मिळू शकतो याचीच प्रचिती आली अन् संतोष शेडगे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत कोरोना स्थितीत ऐन आवश्यकतेवेळी 51 जणांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. तर बालाजी मोबाईलमधील कोरोनामुक्त अजित साबळे यांनी प्लाझ्मा दान करुन समाजाप्रती कर्तव्यभान जपले.
या सुखद अनुभवाची कहाणी अशी, संतोष शेडगे यांच्या मित्राला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याला रक्ताची गरज होती. सगळेजण तणावाखाली होते. त्यावेळी धावपळ झाली. शेवटी बालाजी ब्लड बँकेतून रक्त विकत घ्यावे लागले. पण त्यावेळी ब्लड बँकेचे भोसले यांच्याशी चर्चेतून शेडगे यांना रक्तदानाचे महत्व कळले अन कोरोना स्थितीतील सद्य परिस्थितीतील आवश्यकताही समजली.
काहीतरी केले पाहिजे असे शेडगे यांचे मन त्यांना सांगत होते. काय करुया म्हणत त्यांनी त्यांच्या फेसबुक अकौंटवर बालाजी मोबाईलतर्फे रक्तदान शिबिर घेत असल्याचा एक संदेश व्हायरल केला. कोरोना स्थिती गर्दी करायची नसल्याने मग बालाजी ब्लड बँकेची गाडी फक्त येणार होती. एका वेळेला दोन रक्तदाते त्या गाडीत रक्तदान करु शकणार होते. नेमका काय प्रतिसाद मिळणार ? हे शेडगे यांनाही माहिती नव्हते. मात्र त्यांनी बालाजी मोबाईलमधील युवकांची फळी तयार करुन ठेवली होती.
मंगळवारी सकाळी 9 वाजता गाडी शाहू स्टेडियम परिसरात येवून थांबली. संतोष शेडगे व त्यांचा मित्र अमोल ढाणे पहिल्यांदा रक्तदान करुन या उपक्रमाचा शुभारंभ करणार होते. त्यांना यायला थोडा वेळ लागला तोपर्यंत गाडीत कोणीतरी फारसा ओळख नसलेला युवक रक्तदान करण्यासाठी अगोदरच पोहोचला होता व प्रक्रिया देखील सुरु होती. सोशल मिडियाचे आवाहन पाहून उत्स्फूर्तपणे पहिल्यांदा रक्तदान करणाऱया युवकाचे नाव होते स्वप्निल पडवळ. त्यानंतर रस्त्याने येणारे जाणारे पण चौकशी करुन रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त होते. कोणतीही ओळखपाळख नसताना मिळत असलेला प्रतिसाद पाहून शेडगे व त्यांच्या मित्रांना आश्चर्य वाटले.
एकतर सध्या दवाखान्यात जायलाच माणसं घाबरत आहेत. रक्तदान करायचे म्हटले तर थोडी भीती असतेच. मात्र कोणीतरी पुढाकार घेतला तर त्याला किती चांगला प्रतिसाद मिळतो याचा अनुभव बालाजी मोबाईल ग्रुप व बालाजी ब्लड बँकेला आला. कारण दिवसभरात बालाजी मोबाईलमधील कर्मचारीवृंदासह सोशल मिडियाचे आवाहन वाचून आलेल्यांचे रक्तदान त्या गाडीत उरकेपर्यंत रात्रीचे 8.30 वाजले. ज्या संतोष शेडगे यांना पहिल्यांदा रक्तदान करायचे होते. त्यांनाच थांबून शेवटच्या सत्रात रक्तदान करावे लागले. मात्र या सुखद अनुभवाने सामाजिक बांधिलकी, माणुसकी सर्वांनाच अनुभवास आली.
एक हाक दिली अन घडून गेले
मात्र जोपर्यंत स्वतःवर एखादी वेळ येत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही. रक्तदानाची गरज मला कळाली अन मी सहज आवाहन केले. त्याला बालाजी मोबाईलमधील 30 जणांनी व इतर मित्रपरिवारासह अनोळखी युवकांनी देखील सहकार्य पेल्याने 51 जणांकडून एक सत्कार्य घडल्याचा आनंद आहे. एक हाक दिली अन चांगले काम घडून गेले. असाच अनुभव आला. आता पुढील वेळी नियोजन करुन मोठय़ा संख्येने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे.