40 वर्षे जुना उपचाररहित आजार
@ वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान कंपनी मॉडर्नाला एचआयव्हीच्या लसीच्या मानवी परीक्षणाची मंजुरी मिळाली आहे. कंपनी लवकरच हे परीक्षण सुरू करणार आहे. 40 वर्षे जुना हा आजार आजही उपचाररहित आहे. या आजारासाठी आतापर्यंत 30 हून अधिक लसी तयार करण्याचा प्रयत्न झाला आहे. पण यातील एकही यशस्वी ठरलेली नाही. मॉडर्नाच्या लसीत वापरल्या जाणाऱया तंत्रज्ञानामुळे ती यशस्वी होण्याची मोठी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एचआयव्हीच्या या लसीच्या निर्मितीकरता एम-आरएनए तंत्रज्ञानाचा वापर होतोय. मॉडर्नाने कोरोनावरील लस तयार करण्यासाठी देखील याच प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. एचआयव्हीवरील लसीचे मानवी परीक्षण सप्टेंबरच्या प्रारंभी सुरू होणार आहे. एचआयव्हीवरील लस तयार करण्याचे अनेक प्रयत्न आतापर्यंत झाले आहेत, यातील अनेक लसप्रकल्प वैद्यकीय परीक्षणाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.
मानवी परीक्षणाचे स्वरुप
मॉडर्नाची लस एमआरएनए-1644 चे 56 जणांवर परीक्षण होणार आहे. हे लोक पूर्णपणे तंदुरुस्त असतील, त्यांना एचआयव्ही लागण झालेली नसेल. परीक्षणाद्वारे लसीची सुरक्षितता आणि इम्यून रिस्पॉन्समध्ये होणारा बदल पाहिला जाणार आहे. या लसीच्या विकासासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनकडून आर्थिक मदत केली जात आहे.
लसीची कार्यपद्धत
औपचारिक स्वरुपात याला एमआरएनए-1644 म्हटले जाते. आमच्या इम्यून सिस्टीमच्या बी पेशींना उत्तेजित करण्यासाठी ती तयार केली जाते. त्या एकप्रकारच्या पांढऱया रक्तपेशी असतात, ज्या अँटीबॉडी तयार करतात. या अँटीबॉडी हल्लेखोर बॅक्टेरिया आणि विषाणूंना रोखतात. या बी पेशीच न्यूट्रलायजिंग अँटीबॉडीची निर्मिती करतात. या एकप्रकारच्या विशेषकृत ब्लड प्रोटीन्स असतात, ज्या एचआयव्हीच्या सरफेस प्रोटीन्सना निष्क्रीय करतात. यामुळे विषाणूचा प्रभाव घटू लागतो.
लसीचे महत्त्व
एड्सचा आजार मागील 40 वर्षांपासून समाजात फैलावलेला आहे. यावरील उपचारात वापरल्या जाणाऱया एआरटी ट्रीटमेंटमध्ये आतापर्यंत मोठी प्रगती झाली आहे. याचमुळे एड्सने ग्रस्त लोक दीर्घकाळापर्यंत जिवंत राहू शकतात. पण ही हयातभर चालणारी उपचारपद्धत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 2020 मध्ये जगभरात 3.77 कोटी लोक एचआयव्हीने संक्रमित होते. सर्वसामान्य लसीप्रमाणे एचआयव्हीची लस तयार केली जाऊ शकत नाही. आरएनए आधारित इम्युनायजेशनला एका उत्तम लस पर्यायाच्या स्वरुपात पाहिले जात आहे. कारण या तंत्रज्ञानात लाइव्ह व्हायरसचा वापर होत नाही. उर्वरित लसींच्या तुलनेत ही सहजपणे तयार केली जाऊ शकते. तसेच याचा जलदपणे विकास केला जाऊ शकतो.