प्रतिनिधी/ सातारा
’गुगल पे कस्टमर केअर’ मधून बोलत असल्याची बतावणी करून रिचार्जसाठी गेलेली रक्कम परत मिळवून देण्याच्या बहाण्याने एनी डेस्क हे ऍप्लीकेशन मोबाइलमध्ये डाऊनलोड करायला सांगून त्याद्वारे बँक खात्यातील 98 हजार 462 रुपये लंपास करत फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी वैशाली सुधीर कांबळे (रा. विलासपूर, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरविंद कुमार नावाच्या व्यक्तीविरोधात सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर सांगवी (ता. फलटण) येथील युवकालासुद्धा एनी डेस्क ऍप डाऊनलोड करायला लावून त्याच्या खात्यातून 1 लाख 38 हजार 128 रुपये काढले.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 29 रोजी कांबळे यांच्या मोबाईलवर 7364800328 या क्रमांकावरून फोन आला होता. समोरून बोलणाऱया व्यक्तीने ‘गुगल पे’ कस्टमर केअर सेंटरमधून अरविंद कुमार बोलत असल्याचे सांगितले. रिचार्ज करण्यासाठी गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये एनी डेस्क हे ऍप्लीकेशन डाऊनलोड करा’’ असे सांगितले.
त्याने सांगितल्याप्रमाणे कांबळे यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये एनी डेस्क हे ऍप्लीकेशन डाऊनलोड केले. त्यानंतर त्या ऍप्लीकेशनच्या माध्यमातून कांबळे यांच्या बँक खात्याचा ऍक्सेस मिळवून संशयिताने त्यांच्या आयडीबीआय बँकेतील खात्यातील 98 हजार 462 रुपये परस्पर काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे करत आहेत.