पार्लेने आधीपासूनच उत्पादनात केली घट- लवकरच परिस्थिती बदलण्याची आशा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एफएमसीजी अर्थात जलदगतीने विकल्या जाणाऱया ग्राहकोपयोगी वस्तु बनवणाऱया कंपन्यांनी कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उत्पादनात घट केली असल्याचे दिसून आले आहे.
अनेक ग्राहकोपयोगी वस्तु बनवणाऱया कंपन्यांनी सध्या आपल्या उत्पादनात घट केली असल्याचे सांगण्यात येत आहे. रोजच्या लागणाऱया वस्तुंचा यात समावेश असल्याचे समजते. रिटेल चेन्स, इ-कॉमर्स कंपन्या आणि वितरकांकडून वितरण प्रक्रियेत समस्या येत असल्याचे समजते. कोरोनामुळे अनेक कर्मचाऱयांनी सुट्टी घेतलेली आहे. त्यामुळे ऑनलाइन रिटेलर आणि मोठय़ा शोरूम चालकांना पुन्हा साठा करण्यासाठी विलंब होताना दिसतो आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडूनही मागणीत घट झाल्याचे कारण पुढे आले आहे.
पार्लेकडून 40 टक्के घट
बिस्कीट क्षेत्रात भारतात नावाजलेल्या पार्ले कंपनीनेही आपल्या उत्पादनांच्या निर्मितीत घट केली आहे. जवळपास उत्पादन 40 टक्के कमी घेण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येते. काही नेहमीच्या क्लायंटस्ची ऑर्डरही पार्लेने घेतलेली नाही. मागच्या वर्षाच्या तुलनेत ऑर्डर्समध्ये 50 ते 60 टक्के वाढ झाली असून लाटेचा परिणाम कमी होऊन लॉकडाऊन मागे घेतले गेल्यास विक्रीत पुन्हा जोर दिसू लागेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागात मागणी प्रभावीत
इमामीच्या संचालक हर्षा अग्रवाल यांच्या मते, कोरोनाच्या दुसऱया लाटेचा परिणाम शहरी भागाबरोबर याखेपेस ग्रामीण भागात जाणवू लागल्याने ग्राहकोपयोगी वस्तुंच्या मागणीवर त्याचा थेटपणे परिणाम होताना दिसतो आहे. मागणी ग्रामीण भागात घसरली आहे. परिस्थितीत लवकरच सुधारणा होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.