क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील यंदाच्या मोसमात एफसी गोवाने आपल्या पराभवांचा षटकार काल ठोकला. बांबोळीतील ऍथलेटीक स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात जमशेदपूर एफसीने एफसी गोवाला एकमेव गोलने पराभूत केले आणि त्यांना स्पर्धेतील सहाव्या पराभवास सामोरे केले.
सामन्याच्या 49व्या मिनिटाला डॅनियल चिमा चुक्वूने केलेला गोल जमशेदपूर एफसीसाठी तीन गुण देऊन गेला. या विजयाने जमशेदपूर एफसी आता गुणतालिकेत दुसऱया स्थानावर गेला आहे. 12 सामन्यांतून सहा विजय व चार बरोबरीने त्यांचे 22 गुण झाले. एफसी गोवाचा हा सहावा पराभव. 14 सामन्यांतून केवळ तीन विजय आणि पाच बरोबरीने त्यांचे 14 गुण आणि नववे स्थान अबाधित राहिले.
पहिल्या सत्रात उभय संघांचे समान वर्चस्व लढतीवर आढळून आले. जमशेदपूरचा धोकादायक स्ट्रायकर डॅनियल चिमाला पहिल्या सत्रात रोखून ठेवण्यात एफसी गोवाच्या बचावफळीला यश आले. तरी सुद्धा चिमाचे दोन वेळ गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले.
सामन्याच्या 28व्या मिनिटाला एफसी गोवाची गोल करण्याची नामी संधी हुकली. यावेळी आयव्हन गोन्झालेझने हाणलेला फटका गोलच्या आडव्या पट्टीला आदळून परत आल्यानंतर एदू बेडियाचा फटका जमशेदपूर एफसीचा गोलरक्षक टी. पी. रेहनेशने अडवून संघावर होणारा संभाव्य गोल वाचविला. पहिल्या सत्रात उभय संघ गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱया सत्राच्या आरंभालाच जमशेदपूर एफसीने गोल करून आघाडी घेतली. लालडियाना रेंथलीने दिलेल्या पासवर डॅनियल चिमाने यावेळी मात्र कोणतीही चूक न करता एफसी गोवाचा गोलरक्षक नवीनकुमारला भेदले व चेंडू जाळीत टोलविला.
या गोलनंतर जमशेदपूर एफसीच्या बोरीस सिंगने गोल करण्याची सोपी संधी गमविली. एफसी गोवाला नंतर लगेच गोल बाद करण्याची संधी मिळाली होती. मात्र, यावेळी एदू बेडियाने घेतलेल्या फ्रिकीकवर अन्वर अलीने मारलेला फटका गोलच्या आडव्या पट्टीला आदळला तर 67व्या मिनिटाला आयव्हन गोन्झालेझने दिलेल्या क्रॉसवर आल्बेर्तो नॉग्वेरा चेंडूला गोलची दिशा दाखविण्यात अपयशी ठरला. शेवटच्या दहा मिनिटात एफसी गोवाने गोल बाद करण्यासाठी बदली खेळाडूंना स्थान दिले. मात्र त्यांना बरोबरी गाठण्यास अपयश आले.