आडाळी ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’ संस्थेचा पुढाकार : स्थानिकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार
प्रतिनिधी / दोडामार्ग:
आडाळी-दोडामार्ग येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने (एमआयडीसी) विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रात नोकरी, रोजगार, व्यवसायात स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी व स्थानिक लोकांचे हितरक्षण करण्यासाठी ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’ या शासन नोंदणीकृत सेवाभावी संस्थेच्या विश्वस्त मंडळाने ‘आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी येथे दिली. समितीत 12 जणांचा समावेश करण्यात आला असून पराग गावकर हे मुख्य समन्वयक, तर प्रवीण गावकर हे सचिव म्हणून काम करणार आहेत.
याबाबतची माहिती देताना लळीत म्हणाले की, या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी आडाळी ग्रामस्थांनी आपली सुमारे 650 एकर जमीन दिली आहे. एमआयडीसीच्यावतीने त्या जमिनीवर सपाटीकरण, अंतर्गत रस्ते वगैरे विकासकामे सुरू झाली आहेत. औद्योगिक भूखंड उद्योजकांना येत्या वर्ष दोन वर्षात मिळण्याची शक्यता आहे. आडाळी एमआडीसी केवळ आडाळी गावच नव्हे, तर दोडामार्ग तालुक्यातील बेरोजगार युवक-युवती, लघुउद्योजक, कुशल व अकुशल कामगार, व्यापारी, वाहतूक व्यावसायिक व इतरांच्या विकासाची गंगोत्री ठरणार आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र, याचा जास्तीत जास्त फायदा स्थानिकांना होणे अपेक्षित आहे. अन्यथा बाहेरील व विशेषत: परराज्यातील व्यावसायिक, कामगार येथे येऊन आपले बस्तान बसवतील. यासाठी ‘आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
समितीत बाराजणांचा समावेश
पराग गावकर (आडाळी) हे समितीचे समन्वयक व प्रवीण गावकर (आडाळी) हे सचिव म्हणून काम पाहतील. सदस्यपदी अनंत एकनाथ नाडकर्णी (फोंडिये), अजित मनोहर देसाई (कळणे), सुनिता कमलाकर भिसे (कळणे), शैलेश जयवंत गावकर, गोविंद अर्जुन परब, सिद्धेश जयप्रकाश गावकर, पुंडलिक शांताराम गावकर, कृष्णा सगुण सावंत, नारायण तुकाराम गावकर (सर्व रा. आडाळी), स्वप्नील जगन्नाथ ठाकुर (मोरगाव) यांचा समावेश आहे.
समितीच्यावतीने औद्योगिक क्षेत्रात भविष्यात येणाऱया उद्योगांमध्ये काम किंवा नोकरी करण्यासाठी आडाळी गावातील, पंचक्रोशीतील व दोडामार्ग तालुक्यातील इच्छुक कुशल व अकुशल बेरोजगार युवक-युवती, स्त्राr-पुरुष यांचा माहितीकोश (डाटाबँक) तयार करण्यात येईल. तसेच आडाळी गावातील जे आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छितात (हॉटेल, खानावळ, फूडस्टॉल, किराणा दुकान, अन्य दुकाने, भाजीपाला दुकान, गॅरेज, रिक्षा, टेम्पो वाहतूक वगैरे) अशांचा माहितीकोश (डाटा बँक) तयार करण्यात येईल.
10 ते 20 ऑगस्टदरम्यान अर्ज भरून घेणार
यासाठी समितीने माहितीचा एक अर्ज तयार केला असून इच्छुकांना हा नमुना आधार कार्ड क्रमांकासह भरून द्यावा लागेल. हा अर्ज ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’च्या आडाळी येथील कार्यालयात उपलब्ध असून तो समक्ष भरून द्यावा लागेल. 10 ते 20 ऑगस्ट या कालावधीत (रविवार वगळून) ‘घुंगुरकाठी भवन, आडाळी’ येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत भरून द्यावा.
लळीत म्हणाले की, संबंधित उद्योगाचे मालक, व्यवस्थापक यांना समितीने तयार केलेल्या माहितीकोशाची माहिती दिली जाईल. उद्योग आस्थापनेला आवश्यक असलेला कुशल व अकुशल कामगार वर्ग प्राधान्याने आडाळी गावातील किंवा आडाळीतून उपलब्ध न झाल्यास दोडामार्ग तालुक्यातून घेण्याची विनंती केली जाईल. उद्योजकांना लागणाऱया अन्य सेवा सुविधांसाठी आडाळीतील व्यावसायिकांचा प्राधान्याने विचार करण्याची विनंतीही त्यांना केली जाईल.