124 केंद्रांवरील 1843 वर्गखोल्यांमध्ये परीक्षा होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
जरा जपून… सुरक्षित अंतर राखा… कामाशिवाय गर्दी करू नका… मास्क तर हवाच… रांगेत उभारूनच क्रमांक पहा… पाण्याची बॉटल विसरू नका… या सूचना प्रामुख्याने आरोग्यक्षेत्राशी संबंधित आहेत. मात्र एसएसएलसी परीक्षेच्या यशस्वीतेसाठी या सर्व सूचना विद्यार्थ्यांना पाळाव्या लागणार आहेत. 2019-2020 या शैक्षणिक वर्षाला कोरोनाचा ब्रेक लागला आणि ऐन परीक्षेच्या तोंडावर परीक्षा लांबणीवर पडली. आता परीक्षा घेण्यात येणार असून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थी संख्येपासून, परीक्षा केंद्र व परीक्षेला जाताना… या सूचनांची यादी देखील बदलली आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात एकूण 33 हजार 180 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून एकूण जिल्हय़ात 104 व 20 उपकेंद्रे मिळून 124 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षा घेताना सीसीटीव्हीची सक्ती आणि गैरप्रकार होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना करण्यात आल्या असल्या तरी सर्वात मोठे आव्हान म्हणजे महामारीच्या संकटाची छाया विद्यार्थ्यांवर येणार नाही याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांची संख्या वाढविण्यात आली असून यामुळे एकूण 124 केंद्रांवरील 1843 वर्गखोल्यांमध्ये परीक्षा होणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी व बाकात तीन फुटाचे अंतर या तत्त्वाचे पालन करतच मिशन एसएसएलसी यशस्वी करावी लागणार आहे.
परीक्षा खोल्यांची संख्या वाढविली
एसएसएलसी परीक्षेला एका वर्गखोलीत 25 ते 30 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात येते. मात्र कोरोनामुळे परस्परात सामाजिक अंतर राखताना तीन फूट अंतर असणे आवश्यक आहे. यामुळे बेळगाव शहर वगळता इतर शैक्षणिक तालुक्यांमध्ये परीक्षा उपकेंद्रांची संख्या वाढविण्यात आली. यामुळे मागील नियोजनाप्रमाणे 1446 परीक्षा खोल्यांमध्ये एसएसएलसी परीक्षा होणार होती. मात्र अंतराची मर्यादा पाळताना 437 परीक्षा खोल्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात परगावाहून आलेले 770 विद्यार्थी याठिकाणी परीक्षा देणार आहेत. यामुळे सदर विद्यार्थ्यांची देखील भर पडली आहे. यामुळे पूर्वीच्या तुलनेत परीक्षा खोल्यांची संख्या वाढविली आहे. परिणामी गरज लागल्यास प्राथमिक शिक्षकांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
एम. जी. बेळ्ळण्णावर (एसएसएलसी जिल्हा नोडल ऑफिसर)
परीक्षा पार पाडणे हे आवाहन असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी करण्यात आली आहे. परीक्षा खोल्यांची संख्या वाढविण्यात आली असून दोन बाकात 3-3 फुटाचे अंतर राखण्यात येणार आहे. केंद्रांवर बैठक क्रमांक पाहण्यासाठी विशेष व्यवस्था व पर्यवेक्षकांसाठी हँडग्लोज, मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राखले जावे यासाठी उपकेंद्रे वाढवावी लागली आहेत.