जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिपादन : संशोधन सुरूच राहणार
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
कोरोनाची लक्षणे न दिसून येणाऱया (एसिम्प्टोमॅटिक) रुग्णांकडून हा संसर्ग इतरांमध्ये फैलावण्याची शक्यता धूसर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्टले आहे. उपलब्ध आकडेवारीतून ही बाब सिद्ध होत असल्याचेही डब्ल्यूएचओने नमूद केले आहे. मागील काही काळापासून संशोधक एसिम्प्टोमॅटिक रुग्णांसंबंधी साशंकता व्यक्त करत आहेत.
महामारीच्या प्रारंभी कोरोना विषाणू एका बाधिताकडून दुसऱया व्यक्तीत फैलावत असल्याचे पुरावे मिळाले होते. एसिम्प्टोमॅटिक रुग्णांकडून संसर्ग फैलावत असला तरीही जगात ज्याप्रकारे संख्या वाढतेय त्यासाठी हे रुग्ण कारणीभूत नाहीत. विशेषकरून तरुण आणि अन्य तंदुरुस्त व्यक्तींमध्ये या संसर्गाची लक्षणे दिसून येत नाहीत किंवा ती सौम्य असतात, असे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेच्या महामारी विषयक तज्ञ डॉ. मारिया वेन यांनी काढले आहेत.
लक्षणेयुक्त रुग्ण
सद्यकाळात आमचा भर केवळ लक्षणे आढळून येणाऱया रुग्णांवर आहे. लक्षणे आढळून येणारे रुग्ण, आयसोलेशन आणि क्वारंटाईनमधील लोक आणि त्यांच्याकडून होणारा फैलाव नियंत्रित केल्यास कोरोना विषाणूच्या महामारीचा आकडा वेगाने खाली येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
बाधितांचा शोध घेण्यास प्राधान्य द्या…
नर्सिंग होम किंवा घरांमध्ये एसिम्पटोमॅटिक रुग्णांकडून संसर्ग फैलावल्याचे अहवाल अनेक देशांमधून प्राप्त झाले आहेत. परंतु यासंबंधी अचूक उत्तर शोधण्यासाठी अद्याप विस्तृत संशोधन आणि व्यापक आकडेवारीची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत कोरोना बाधितांचा शोध घेणे आणि त्यांचे विलगीकरण करण्यावर विविध देशांमधील सरकारांनी भर द्यावा. रुग्णांच्या संपकांत येणाऱयांवरही नजर ठेवणे आवश्यक असल्याचे डॉ. मारिया यांनी म्हटले आहे.