वृत्तसंस्था/ नवीदिल्ली
तामिळनाडूचा माजी डावखुरा फलंदाज तसेच माजी कर्णधार श्रीधरन शरथ याची कनिष्ठांच्या राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती चेअरमनपदी बीसीसीआयने नियुक्ती केली आहे.
2021 राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आठवडाभराचा कालावधी शिल्लक असताना भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने शुक्रवारी एस. शरथची राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती प्रमुखपदी घोषणा केली. या निवड समितीमध्ये अन्य 4 सदस्यांचा समावेश आहे. उत्तर विभागातून पंजाबचा माजी अष्टपैलू किसन मोहन, पूर्व विभागातून बंगालचा माजी वेगवान गोलंदाज रणदेव बोस, पश्चिम विभागातून गुजरातचा माजी फलंदाज प्रतिक पटेल आणि मध्य विभागातून मध्य प्रदेशचा माजी वेगवान गोलंदाज हरविंदर सिंग सोधीचा समावेश आहे.
एस. शरथने आपल्या पंधरा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये शंभर रणजी सामने खेळले असून त्याने तामिळनाडू संघाचे नेतृत्व केले आहे. प्रथमश्रेणी सामन्यात त्याने 27 शतके आणि 42 अर्धशतकांसह 139 सामन्यात 8 हजार 700 धावा जमविल्या आहेत. पाच सदस्यांची ही निवड समिती आता 19 वर्षांखालील वयोगटाचा भारतीय संघ निवडणार आहे. पुढील वर्षी विंडीजमध्ये होणाऱया युवा विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सदर निवड समिती संघाची निवड करणार आहे.