ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोघींवर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू होते. आज या दोघींना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती स्वतः अभिषेक बच्चन याने ट्विट करुन दिली आहे.
तो आपल्या ट्विट मध्ये म्हणाला, तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा कायम ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. त्या आता घरी राहतील. मी आणि बाबा अजूनही रुग्णालयातच राहणार आहोत, असे म्हणत त्याने चाहत्यांचे आभार ही मानले.
महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबीयांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्यावर अजूनही नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशभरातील लाखो चाहते अमिताभ बच्चन कोरोनातून लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहेत. अमिताभ बच्चनही उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.