प्रतिनिधी / कोल्हापूर
लेखक विद्यासागर अध्यापक लिखित ‘ऐश्वर्या ब्युटी पार्लर’ हे नाटक व्यवसायिक रंगभूमीवर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाटकाच्या रंगीत तालमी 1 फेब्रुवारीपासून मुंबई येथे होणार आहेत. या नाटकामध्ये कोल्हापुरातील प्रमोद फडतरे आणि पूर्वा कोडोलीकर या कलाकारांना संधी दिली आहे. हे नाटक व्यवसायिक रंगभूमीवर 8 मार्च महिला दिनी आणण्याचा मानस आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत अभिनेता भरत जाधव यांनी दिली.
अभिनेता जाधव म्हणाले, ‘ऐश्वर्या ब्युटी पार्लर’ हे नाटक पाहण्यासाठी केशवराव भोसले नाटय़गृहात गेलो. या नाटकाची भन्नाट थिम पाहून हे नाटक व्यवसायिक रंगभूमीवर सादर करण्याचा प्रस्ताव विद्यासागर अद्यापक यांच्यासमोर ठेवला आहे. महिलांच्या जिव्हाळय़ाचा प्रश्न असलेल्या नाटकाला व्यवसायिक स्वरूप देण्यासाठी थोडेफार बदल करण्याचे काम लेखकाच्या म्हणण्यानुसार सुरू आहे. या नाटकातील कलाकारांच्या भुमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. कोल्हापुरचे नाटक राज्यभर पोहचवण्याचा मला खूप आनंद होईल. यामधील मुख्य कलाकारांची नावे लवकरच अंतिम करून रंगीत तालीम करण्यास सुरूवात करणार आहोत. या नाटकाचे दिग्दर्शन राजन ताम्हणकर तर नेपथ्य प्रदीप मुळे करीत आहेत. त्यामुळे व्यवसायिक रंगभूमीवर दर्जेदार नाटक देण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहोत. कलाकाराने जीव ओतून केलेली भुमिकाच त्याला मुंबईकडे घेवून जाते. नाटकच कलाकारांचा मूळ पाया आहे. यावेळी कलाकार प्रमोद फडतरे आणि पूर्वा कोडोलीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.