जावा / वृत्तसंस्था
इंडोनेशियातील बालोंगान रिफायनरीला मोठी आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत या भागातील हजारहून अधिक जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. काही लोक या आगीनंतर बेपत्ता झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नसून सुरक्षा यंत्रणेने सध्या आग विझविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
बालोंगान नावाच्या रिफायनरीला स्थानिक वेळेनुसार रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी आग लागली. ही रिफायनरी देशातील सर्वांत मोठय़ा रिफायनरींपैकी एक असून ती सरकारी तेलकंपनी पेर्टामीनाच्या मालकीची आहे. इंडोनेशियातील जावा भागात ही आग दुर्घटना घडली आहे. प्रादेशिक आपत्ती निवारण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 5 जण गंभीररित्या भाजले असून अन्य 18 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर नजिकच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. या आगीमुळे रिफायनरीच्या तेलशुद्धीकरणाच्या क्षमतेला काहीही धक्का पोहचला नसून येत्या पाच दिवसात पूर्ण क्षमतेने काम पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे.