शून्य त्रुटींसह मोहीम फत्ते करण्याचा प्रयत्न : दाक्षिणात्य राज्यांमधील डाटा कलेक्शनमध्ये कर्नाटक करणार नेतृत्व
प्रतिनिधी / बेंगळूर
दीर्घकाळापासून प्रतीक्षित व्याघ्रगणनेस ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे. बहुधा व्याघ्रगणना पावसाळा संपल्यावर सुरू होणार आहे. व्याघ्रगणनेचा डाटा (विदा) थेट ऑनलाईन स्वरुपात अपलोड होणार असून यादरम्यान शून्य त्रुटी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दाक्षिणात्य राज्यांमध्ये डाटा कलेक्शनमध्ये कर्नाटकही नेतृत्व करणार आहे. डाटाचे विश्लेषण, सहाय्य पुरवून वाघांच्या संख्येप्रकरणी देशात दुसऱया स्थानावर असलेले कर्नाटक राज्य स्वतःचे योगदान देणार आहे.
2018 च्या गणनेनुसार 2967 वाघ भारतात आहे. तर यातील 524 वाघ कर्नाटकात आहेत. तर देशात 526 वाघांसह मध्यप्रदेश पहिल्या स्थानावर आहे. मागील गणनेच्या तुलनेत कर्नाटकात 112 वाघांची भर पडली होती. आगामी गणनेसाठी मार्च महिन्यात कर्मचारी तसेच प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पार पडणार आहे. त्यानंतर या मोहिमेत सामील होणाऱया स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मागील गणनेप्रमाणेच यंदाही वाघांची गणना व्याघ्र प्रकल्प तसेच वाघांच्या अस्तित्वाची माहिती मिळालेल्या भागांमध्ये केली जाणार आहे.
राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाकडे (एनटीसीए) प्रस्ताव पाठवून अतिरिक्त स्मार्टफोन्स, रेंज फाइंडर्स, कंपास आणि अन्य उपकरणे गणनेसाठी मागविण्यात आली आहेत. संकलित डाटा थेट स्वरुपात एनटीसीए पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. कागदावर उतरविण्यापूर्वी ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. डाटा संकलनातील अचूकता वाढविणे हा यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
पोर्टलवर डाटा अपलोड होणार
सीमावर्ती भागांकरता डाटा वाईल्डलाइफ इन्स्टीटय़ूट ऑफ इंडिया फॉर टॅब्युलेशनला पाठविण्यात येणार असून याद्वारे एकाच वाघाची दोनवेळा गणना होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. गणनेसाठी पद्धत तसेच योजना आखण्यासाठी दक्षिण विभागातील व्याघ्रप्रकल्प असलेल्या राज्यांमधील वन अधिकारी तसेच व्याघ्रप्रकल्पांमधील फिल्ड डायरेक्टर्सची दोन दिवसीय बैठक 24-25 फेब्रुवारी रोजी तामिळनाडूतील उदगमंडलम येथे पार पडली आहे. अतिरिक्त मुख्य वन संरक्षक (वाइल्डलाइफ) सुभाष मालखेडे यांनी या बैठकीत कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आहे. ऑनलाईन डाटा एंट्रीवर भर देण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.