उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / बेंगळूर
लॉकडाऊनमुळे संकटात आलेल्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना राज्य सरकारने प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी त्वरित मार्गसूची तयार केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी चालकाने बेंगळूरला येण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.
राज्यातील 7 लाख 75 हजार ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत पात्र चालकांनाच मिळावी यासाठी योग्य मार्गसूची तयार करण्यात येत आहे. ही मार्गसूची लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
काही चालक मदत मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी बेंगळूरला येत आहेत. तर काहीजण पोस्टामार्फत अर्ज सादर करीत आहेत. मात्र अशा प्रकारे अनावश्यक पैसा आणि श्रम व्यर्थ घालण्याची आवश्यकता नाही. मार्गसूचीनुसारच मदतीची रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही गोंधळून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.