सर्व्हर डाऊन, इंटरनेट प्रॉब्लेम ठरतोय अडथळा
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी 1 ऑगस्टपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस सुरू झाला. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. लाभार्थ्यांची संख्या साडे अठरा लाख आहे. प्रत्यक्षात 70 हजार जणांना लस मिळाली आहे. दुसर्या डोसमुळे हे थांबलेले लसीकरण तीन महिन्यांनी सुरू झाले, पण ऑनलाईन नोंदणीतील अडथळे आजही आहेत. ऑनलाईन नोंदणीतील अडथळ्यांचा मनःस्ताप लाभार्थ्यांना सोसावा लागत आहे. तर यापुर्वी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांचे काय, हा प्रश्नही उपस्थित होतो आहे.
देशात 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात हेल्थवर्कर्स, दुसर्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स, तिसर्या टप्प्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक, व्याधीग्रस्त, चौथ्या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त, लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. 1 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरूवात झाली, पण लसीचा तुटवडा, दोन लसींमधील वाढलेले अंतर यातून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण थांबले होते. प्रशासनानेही दुसरा डोस घेतलेल्यांना प्राधान्य दिले होते, त्यांची संख्या कमी झाल्यानंतर पुन्हा 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण सुरू झाले.
जिल्ह्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण सुरू झाले, ऑनलाईन नोंदणीतील त्रुटीमुळे ते बंद होते. मधल्या काळात परदेशी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुविधा दिली. शहरात खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्रे वाढली आहे. त्यामुळे लसीकरणावरील ताण कमी झाला आहे. मंगळवारी, 3 ऑगस्टला ऑनलाईन नोंदणी सुरू झाली, बुधवारी ऑनलाईन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लस मिळाली. मात्र बुधवारी पुन्हा ऑनलाईन नोंदणीचा गोंधळ सुरू राहिला. गुरूवारीही लाभार्थ्यांना हा मनःस्ताप सहन करावा लागला.
ऑनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ खुले होताच लाभार्थ्यांची गर्दी होते. प्रत्येकजण नोंदणीसाठी प्रयत्न करतो, पण काही मिनिटांतच संकेतस्थळ ब्लॉक होते, हँग होते. उपलब्ध डोसइतकीच नोंदणी झाल्यानंतर संकेतस्थळ पुढील माहिती घेत नाही, त्यातही पुन्हा सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम येतो. काही जण दिवसभर नोंदणीसाठी मोबाईलवर प्रयत्नशील असतात, पण बेवसाईट केव्हा सुरू होते, अन् कधी स्टॉप होते, हेच समजत नसल्याने गोंधळाची स्थिती आहे.
ऑनलाईन नोंदणीतील त्रुटी दूर : डॉ. फारूक देसाई
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई म्हणाले, जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील 18 लाख 52 हजार 368 लाभार्थी आहेत. त्यापैकी 70 हजार लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. बुधवारी ऑनलाईन नोंदणीत नेटचा प्रॉब्लेम होता. पण आता त्यातील त्रुटी दूर केल्या आहेत. सॉफ्टवेअरमध्ये काही बदल झाले आहेत. डोसच्या संख्ये इतकीच नोंदणी होत असल्याने लाभार्थ्यांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात 22 ग्रामीण रूग्णालये, शहरात 12 ठिकाणी पहिला डोस
ग्रामीण भागात आजरा ग्रामीण रूग्णालय, कागल ग्रामीण रूग्णालय, भुदरगड ग्रामीण रूग्णालय, मुरगुड ग्रामीण रूग्णालय, गांधीनगर उपजिल्हा रूग्णालय, खुपीरे ग्रामीण रूग्णालय, चंदगड ग्रामीण रूग्णालय, वारणा कोडोली उपजिल्हा रूग्णालय, कळे प्राथमिक आरोग्य केंद्र, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय, नेसरी ग्रामीण रूग्णालय, कसबा तारळे प्राथमिक आरोग्य केंद्र, गगनबावडा आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव, ग्रामीण रूग्णालय मलकापूर, ग्रामीण रूग्णालय हातकणंगले, ग्रामीण रूग्णालय पारगाव, युएपीएससी लालनगर इचलकरंजी, शिरोळ ग्रामीण रूग्णालय येथे पहिला डोस दिला जात आहे. कोल्हापुरात 11 नागरी आरोग्य केंद्रांसह कदमवाडी येथील द्वारकानाथ कपूर दवाखाना येथे पहिला डोस मिळत आहे. तसेच सीपीआर हॉस्पिटलमध्ये 45 ते 59 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी पहिला डोस देण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
लाभार्थी : 18,52,368, लसीकरण : 70,000