25 लाख रुपये लागल्याचे सांगून मागितली माहिती : फसवणुकीचे प्रकार वाढले
प्रतिनिधी /बेळगाव
ऑनलाईन फसवणूक आणि फसवणुकीचे प्रयत्न सुरूच आहेत. प्रत्येक वेळेला वेगवेगळी कारणे देत बँक ग्राहकांना ठकविण्यात येत आहे. आता 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून बँक खाते व इतर माहिती मागितली जात आहे. बेळगाव परिसरात असे प्रकार वाढले आहेत.
‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाचा यासाठी वापर केला जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सावजांना थेट फोन कॉल न करता व्हॉट्सऍप कॉल केले जात आहे. व्हॉट्सऍपवर व्हिडीओ आणि व्हॉईस मॅसेज पाठवून 25 लाखांची लॉटरी कशी लागली आहे, हे पटवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शुक्रवारी दुपारी कडोली येथील नंदिनी नामक एका तरुणीच्या मोबाईलवर कॉल आला. ‘कौन बनेगा करोडपती’च्या कोलकात्ता येथील कार्यालयातून बोलत आहे. तुमच्या व्हॉट्सऍप क्रमांकाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. तातडीने एक फोटो, बँक खात्यासंदर्भातील माहिती व्हॉट्सऍपवर पाठवून द्या, असे भामटय़ांनी सांगितले.
तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी तातडीने माहिती पाठवून द्या, पैसे जमा होईपर्यंत ही गोष्ट कोणाला सांगू नका. ‘भगवान की किरपासे आपको लॉटरी लगी है, बदाई हो’ असे सांगत या तरुणीकडून बँक खात्याची माहिती मागविण्यात आली. मात्र आपले खाते आहे ते बंद आहे, असे उत्तर नंदिनीने दिले.
बँक खाते बंद आहे असे सांगताच तुमच्या घरातील इतर कोणाचे खाते सुरू आहे? त्या संबंधिची माहिती द्या, गडबड करा, वेळ निघून जात आहे, तुमच्या खात्यात 25 लाख रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे तातडीने बँक खात्याविषयी माहिती द्या, तुमचा फोटो पाठवा, असा तगादा लावला. मात्र प्रसंगावधान राखून या तरुणीने कोणतीच माहिती भामटय़ांना दिली नाही. त्यामुळे शेवटी त्या भामटय़ाने फोन ठेवून दिला.