प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी रात्रीपासूनच कर्नाटकात कोरोना कर्फ्यू जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य कॉलेज शिक्षण खात्याने पदवी, पदव्युत्तर, बी. एड्. महाविद्यालयांना ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला आहे.
मंगळवारी रात्री यासंबंधीचे अधिकृत पत्रक जारी करण्यात आले असून त्यानुसार 28 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांना यासंबंधीचा आदेश देण्यात आला असून 10 मे पर्यंत ऑनलाईन शिक्षणप्रणालीद्वारे अभ्यासक्रम शिकविण्याची सूचना दिली आहे.
कायदा, संस्कृत, पदवी, पदव्युत्तर, बी. एड्. चित्रकला प्राध्यापकांनी या आदेशाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांसाठी हजर राहण्यासाठी प्रवृत्त करावे, असेही सूचविण्यात आले आहे.
कोरोना परिस्थितीमुळे 21 मे रोजी राज्य सरकारने मार्गसूची जारी करून शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता मंगळवारपासून कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुकूलतेसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवता येईल, असे सरकारने सोमवारी रात्री काढलेल्या आदेशपत्रकात स्पष्ट केले होते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण खात्याने ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले आहेत.