ऑनलाईन टीम / पुणे :
सध्या लोकडाऊनच्या काळात जरी सर्व जण आपापल्या घरी असले तरी मनोरंजन क्षेत्रात नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत. जादूगार धनश्री पावणसकर ह्यांची ‘जादुई दुनिया’ हा यामधील एक यशस्वी प्रयोग आहे.
जादूगार धनश्री यांच्या या फेसबूक लाईव्ह, झूम इत्यादी माध्यमातून एक ते दीड तास सादर होणाऱ्या प्रयोगामध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या, उत्तमोत्तम अशा जादू दाखवल्या जातात. माफक तिकिटावर संपूर्ण परिवारासह बसून या जादुई दुनियेची सफर करणे हा बालगोपालांसाठीच नव्हे तर त्यांच्या पालकांसाठीही एक रोमांचक अनुभव असतो.
जादूगार धनश्री यांच्या मैत्रीपूर्ण हसतखेळत केलेल्या सादरीकरणामुळे आणि अवाक करणाऱ्या जादुई कौशल्यामुळे प्रयोगाचा वेळही जादू केल्यासारखा उडून जातो असे प्रेक्षकांचे मत आहे. त्यातच विशेष बाब म्हणजे जादूगार धनश्री या सर्व बालगोपाल आणि त्यांच्या पालकांना पुन्हा एकदा या जादुई नगरीचा प्रवास घडवणार आहेत. धनश्री या आपला 25 वा प्रयोग 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत ऑनलाईन झूम वर सादर करणार आहेत.
दरम्यान, जादूगार धनश्री यांची ही जादू ई सफर भारतासह भरता बाहेर म्हणजेच कतार, जर्मनी अमेरिका येथे देखील प्रसिद्ध आहे. यासोबतच जादूगार धनश्री यांनी सामाजिक भान राखून upleap foundation मस्ती की पाठशाला यांसारख्या सामाजिक संस्थांसाठीही प्रयोग केले आहेत.