वृत्तसंस्था/ अबुधाबी
प्रत्येक चार वर्षांनी होत असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट या क्रीडा प्रकारातील टी-10 या अतिजलद खेळाचा समावेश करावा, असे वैयक्तिक मत विंडीजचा सलामीचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने व्यक्त केले आहे.
अबुधाबीमध्ये होत असलेल्या आगामी टी-10 लिग स्पर्धेसाठी गेलचे येथे आगमन होण्यापूर्वी गयाना येथून वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने आपले वरील मत व्यक्त केले. या स्पर्धेत तो अबु धाबी संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा ही संपूर्ण जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाते. दरम्यान, या स्पर्धेमध्ये क्रिकेट या क्रीडा प्रकाराचा प्रवेश टी-10 या माध्यमातून केल्यास ही स्पर्धा अधिक आकर्षक बनेल, असेही गेलने म्हटले आहे. अबु धाबी टी-10 लिग क्रिकेट स्पर्धाही जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरेल. लवकरच या स्पर्धेसाठी सरावाला प्रारंभ करणार असल्याचे गेलने सांगितले. अबु धाबीतील या स्पर्धेमध्ये विविध देशांचे क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. अबु धाबी संघामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस तसेच विंडीजचा पोलार्ड यांचा समावेश आहे. अमेरिकेमध्ये टी-10 क्रिकेट स्पर्धेला चांगले व्यासपीठ मिळू शकेल. अमेरिकेला अद्याप क्रिकेटची म्हणावी तशी ओळख नसल्याचे गेलने म्हटले आहे. टी-10 क्रिकेट स्पर्धेपासून स्पर्धा आयोजकांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकेल, असेही गेलने शेवटी सांगितले.