वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा मुष्टीयोद्धा अमित पांघल याला 52 किलो वजन गटात टॉप सिडिंग देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत भारताची महिला मुष्टीयोद्धी सिमरनजित कौर हिला 60 किलो वजन गटात चौथे सिडिंग मिळाले आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुष्टीयुद्ध टास्क फोर्सने काढलेल्या ड्रॉ मध्ये अमित पांघल अग्रस्थानी तर सिमरनजित कौर चौथ्या स्थानी आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सिडिंग मिळविणारे पांघल आणि कौर हे दोनच मुष्टीयोद्धे आहेत. पांघलने विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत रौप्यपदक तर सिमरनजित कौरने कास्यपदक मिळविले होते. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पाच पुरुष आणि चार महिला असे एकूण नऊ मुष्टियोद्धे विविध वजन गटात सहभागी होणार आहेत.