ब्रिटनमध्ये झपाटय़ाने पसरत असलेल्या नव्या कोरोना विषाणूने आता ऑस्ट्रेलियातही ठाण मांडले आहे. या देशाच्या ब्रिस्बेन या शहरात याचा विशेष प्रादुर्भाव दिसून येत असून त्यामुळे या शहरात तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱया स्वच्छता कर्मचाऱयाला या नव्या रूपातील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्याने सर्व हॉटेल्सना विशेष दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
शनिवारपासूनचे 3 दिवस सर्व ब्रिस्बेनवासियांना घरातच काढावे लागणार आहेत. तोपर्यंत या नव्या रूपातील विषाणूच्या नियंत्रणासाठी योजना बनविण्यात येईल. नंतर परिस्थिती अनुकूल दिसून आल्यास लॉकडाऊन शिथील करण्यात येईल, किंवा हटविण्यात येईल, अशी माहिती क्वीन्सलँड प्रांताचे मुख्याधिकारी ऍनास्टाशिया पॅलेझुक यांनी दिली. सध्या हा लॉकडाऊन केवळ ब्रिस्बेनमध्येच आहे.
देशभरात प्रवास निर्बंध
ब्रिस्बेनमध्ये नव्या कोरोनाचे रूग्ण आढळून आल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी देशभरासाठी नवे प्रवास निर्बंध लागू केले. शक्यतो नागरीकांनी प्रवास टाळावा असे आवाहन त्यांनी केले. रेल्वे आणि विमान प्रवाशांसाठी नवे नियम लागू करण्यात आले.
विदेशी प्रवाशांचे विलगीकरण
ऑस्ट्रेलियात येणाऱया प्रत्येक विदेशी प्रवाशाला तो विमानतळावर उतरल्यापासून पुढचे पंधरा दिवस पूर्ण विलगीकरणात रहावे लागणार आहे. विलगीकरणातून त्याची सुटका झाल्यानंतरही त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचा ज्यांच्याशी संपर्क येईल त्यांनाही चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. विमान व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.