सिडनी
ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय संग्रहालयाने 14 प्राचीन दुर्मिळ कलावस्तु परत करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या प्राचीन वस्तु चोरून येथे आणल्या होत्या, ज्यात मूर्ती, छायाचित्रे यांचा समावेश आहे. सदरच्या वस्तू भारताला पुढील काही महिन्यात मिळणार असल्याचे तेथील सूत्रांकडून सांगण्यात आले.
यासंदर्भात संग्रहालयाचे संचालक निक मित्झेवीच यांनी वरील माहिती दिली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कला जतनाच्या वस्तूंची किंमत अंदाजे 22 दशलक्ष डॉलर्स इतकी असल्याचे सांगितले जाते. इतिहासकालीन अशा या वस्तू जतन करणे जरुरीचे असल्याने आपण या वस्तू भारताला परत करत आहोत, असे निक यांनी सांगितले. न्यूयॉर्क येथील माजी कलावस्तु विक्रेते सुभाष कपूर यांच्यावर सदरच्या वस्तुंच्या तस्करीचा आरोप झाला आहे. त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे समजते. कॅनबेरा संग्रहालयाने यापूर्वीच सुभाष कपूर यांच्याकडील अशा प्रकारच्या कलावस्तू भारताला परत केल्याचे समजते.