हरमनप्रीत सिंग कर्णधारपदी, अमित रोहिदास उपकर्णधार, 5 सामन्यांच्या मालिकेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी हॉकी इंडियाने 23 सदस्यीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली असून 26 नोव्हेंबरला ऍडलेडमधील सामन्याने या दौऱयाची सुरुवात होईल.
भारतीय पुरुष हॉकी संघ या दौऱयात पाच सामने यजमानाविरुद्ध खेळणार असून पुढील वर्षी ओडिशामध्ये होणाऱया एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या तयारीसाठी या दौऱयाचे आयोजन करण्यात आले आहे. भुवनेश्वर-राऊरकेला येथे 13 जानेवारीपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असल्याचे हॉकी इंडियाने सांगितले.
अनुभवी ड्रगफ्लिकर हरमनप्रीत सिंग याची या संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर अमित रोहिदासकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आघाडी फळीत मनदीप सिंगचा दिलप्रीत सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग यांच्यासह समावेश करण्यात आला आहे. गुर्जंत सिंग, आकाशदीप सिंग, मोहम्मद राहील मौसीन, राजकुमार पाल, निलकांता शर्मा, शमशेर सिंग, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग व सुमित यांचा मिडफिल्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. बचावफळीत वरुण कुमारने पुनरागमन केले असून न्यूझीलंड व स्पेन यांच्याविरुद्ध झालेल्या हॉकी प्रो लीगमधील सामने त्याला हुकले होते. जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, मनदीप मोर, नीलम संजीव झेस हे बचावफळीत खेळणारे अन्य खेळाडू आहेत.
या संघाबद्दल बोलताना पुरुष हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले की, ‘पुढील वर्षी भारतात होणाऱया विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाचा एक दावेदार असलेल्या बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी या दौऱयातून मिळणार आहे. यातून आपल्याला खेळाडूंची क्षमता आजमावून पाहता येणार आहे. अनुभवी खेळाडूंची भक्कम टीम आम्ही निवडली असून त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होईल, अशी आम्हाला आशा वाटते.
याशिवाय या संघात युवा खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे. अव्वल स्तरावर खेळण्याचा अनुभव त्यांना या दौऱयातून मिळेल आणि आपल्या संघाची डेप्थही त्यातून समजण्यास मदत होणार आहे,’ असे ते म्हणाले.
ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी निवडलेला भारतीय हॉकी संघ : गोलक्षक-कृशन बहादुर पाठक, पीआर श्रीजेश. बचावफळी-जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास (उपकर्णधार), जुगराज सिंग, मनदीप मोर, नीलम संजीव झेस, वरुण कुमार. मध्यफळी-सुमित, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, शमशेर सिंग, निलकांता शर्मा, राजकुमार पाल, मोहम्मद राहील मौसीन, आकाशदीप च्ंग, गुर्जंत सिंग. आघाडी फळी-मनदीप सिंग, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग.