आज दत्त चौकात भाजपकडून निषेध आंदोलन
प्रतिनिधी/ कराड
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या आहेत. आघाडी सरकारने वेळीच इम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर ओबीसींवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. सरकारच्या या नाकर्तेपणाचा बुधवारी 15 रोजी दत्त चौकात भाजपतर्फे जाहीर निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी व ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषेदत दिली.
पावसकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणूनबुजून काढून घ्याचे होते. त्यामुळे न्यायालयाला त्यांनी इम्पेरिकल डेटा दिला नाही. ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. म्हणजेच सरकारने मागासवर्गीय आयोग नेमूनसुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही. आम्ही केवळ ओबीसी समाजासोबत आहोत, असा दिखावा आघाडी सरकारने करून ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. चार मार्च रोजी पाच जिह्यातील ओबीसी प्रवर्गाचे जिल्हा परिषद सदस्य यांना अपात्र ठरविण्याच्या निर्णय जेव्हा न्यायालयाने दिला, तेव्हापासून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते वारंवार आघाडी सरकारला सांगत होते की जर राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण टिकवायचे असेल तर राज्यात मागासवर्ग आयोग गठीत करून त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा संकलित करावा. तो न्यायालयात सादर करावा. तसे निर्देश न्यायालयाने 13 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारला दिले होते. परंतु सरकारने हेतुपुरस्परपणे त्याकडे दुर्लक्ष केले. श्री. बागडी म्हणाले, जातिनिहाय जनगणना करावी व 2011 चा डेटा केंद्र सरकारने द्यावा अशा प्रकारची वक्तव्य आघाडीतील मंत्री व नेते खोटय़ा वल्गना करीत बसले. इम्पेरिकल डेटाच आवश्यक आहे ती गोष्ट लक्षात आल्यानंतरही डेटा गोळा करण्याबाबत मागासवर्ग आयोगाला अधिकार दिले नाहीत. कोणतीही एजन्सीही याबाबत नियुक्ती केली नाही. ओबीसी समाजाला खोटय़ा आशेवर ठेवून त्यांची समाजाची दिशाभूल करून ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून बाजूले केले. म्हणून सरकारचा ओबीसी समाजातर्फे व भाजपच्या ओबीसी मोर्चाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारी येतील दत्त चौकात निषेध करण्यात येणार आहे. ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व सरकाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. यावेळी ओबीसी मोर्चा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनाही निषेध केला.