ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात सोमवारी ओमायक्रॉनच्या दोन नव्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. त्यामुळे राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या 20 रुग्णांमधील 9 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 40 रुग्ण आढळले असून, त्यामधील निम्मे रुग्ण एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता ओमायक्रॉनचे संकट वाढणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्रात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील 39 वर्षीय महिला आणि लातूरमधील 33 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. हे दोघेही रुग्ण दुबईहून आले असून, ते सध्या विलगीकरणात आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये मुंबईचे 5, पिंपरी- चिंचवडचे 10, पुणे 2, डोंबिवली 1, नागपूर 1 आणि लातूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे.