सहकारी मित्राकडून कृत्य , आरोपीची खुनाची कबुली
म्हापसा / प्रतिनिधी ः
ओशेल-शिवोलीत आशिष दाभोलकर यांच्या घरात पेईंगगेस्ट म्हणून राहणाऱया व संशयास्पद मृत्यू पावलेल्या एकातेरिना टिटोवा (34) या रशियन महिलेचा खून झाल्याचा शवचिकित्सा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, या मृत्यू प्रकरणाचा तपास वेगळय़ा दिशेने नेत हणजूण पोलिसांनी शनिवारी सकाळी मार्ना-शिवोलीत वास्तव्य करून राहणाऱया डेनिस क्रियुचकॉय (37) या रशियन तरुणास सापळा रचून ताब्यात घेतले.
दरम्यान, संशयित डेनिस क्रियुचकॉय याने आपला गुन्हा कबूल केला असून सध्या त्याची रवानगी स्थानिक पोलीस कोठडीत करण्यात आल्याची माहिती हणजूणचे निरीक्षक सूरज गांवस यांनी दिली. दरम्यान, पेशाने नर्तकी असलेल्या एकातेरिना टिटोवा आपल्या सहकारी मित्र डेनिससोबत मृत्यूच्या एकदिवस अगोदर ओशेलात खोलीवर होत्या. रात्री भरपूर मद्यप्राशन केल्यानंतर पहाटे ते झोपी गेली होती, तर सहकारी मित्र डेनिस घराच्या मुख्य हॉलमध्ये झोपी गेला होता.
दरम्यान, 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 वा. हणजूण पोलिसांना एकातेरिना हिचा मृतदेह सापडल्यापासून डेनिस ओशेलातून फरार होता. दरम्यान, बांबोळीच्या गोमेकॉतून आलेल्या शवचिकित्सा अहवालात एकातेरिना हिचा मृत्यू नाक व गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाल्याने हणजूण पोलिसांनी तपासाची दिशा बदलली व सरतेशेवटी गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवारी सकाळी डेनिस क्रियुचकॉय याच्या मार्ना शिवोली येथील भाडोत्री घरातून सापळा रचून ताब्यात घेतले.
संशयित डेनिसची हणजूण पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून सध्या त्याची रवानगी सध्या हणजूणच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या कारवाईत म्हापसाचे उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर, हणजूणचे निरीक्षक सूरज गांवस , क्राईम ब्रँचचे उपनिरीक्षक राहुल परब, हणजुणचे उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर, सुजय कोरगांवकर, अमीर तरल, सुजय कोरगांवकर, महिला पोलीस स्नेहा सावळ, कॉन्स्टेबल राजेश गोकर्णकर, सूरज फोंडवेंकर आदींनी भाग घेतला.