अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम – सित्सिपस, रुबलेव्ह, मेदवेदेव्ह, डिमिट्रोव्ह यांचेही विजय, मरे, किर्गिओस, मॅडिसन कीज पराभूत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
विद्यमान विजेती जपानची नाओमी ओसाका, माजी चॅम्पियन स्लोअन स्टिफेन्स, अमेरिकेची युवा खेळाडू कोको गॉफ, रोमानियाची सिमोना हॅलेप, एरिना साबालेन्का, पुरुष एकेरीत ग्रीकचा स्टेफानोस सित्सिपस, रशियाचा आंदेय रुबलेव्ह, मेदवेदेव्ह, ऍगट, डिमिट्रोव्ह यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. ब्रिटनचा अँडी मरे, अमेरिकेची मॅडिसन कीज, ऑस्ट्रेलियाचा किर्गिओस यांचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले तर मारिन सिलिकने माघार घेतली.
ओसाकाने ग्रँडस्लॅममधील सलग सोळावा विजय मिळविताना 87 व्या मानांकित झेकच्या मेरी बुझकोव्हाचा 6-4, 6-1 असा पराभव केला. यापूर्वी ओसाकाने दोनदा ही स्पर्धा जिंकली असून गेल्या चार वर्षात तिसऱयांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. तिची पुढील लढत पात्रता फेरीतून आलेल्या सर्बियाच्या ओल्गा डॅनिलोविचशी होईल. 2017 ची चॅम्पियन स्टीफेन्सने आपल्याच देशाच्या मॅडिसन कीजवर 6-3, 1-6, 7-6 (9-7) अशी मात केली तर 21 व्या मानांकित कोको गॉफने मॅग्डा लिनेटवर 5-7, -3, 6-4 अशी मात करून दुसरी फेरी गाठली. स्टीफेन्स व गॉफ यांच्यात पुढील लढत होणार आहे. बेलारुसच्या दुसऱया मानांकित साबालेन्काने सर्बियाच्या निना स्टोआनोविचवर 6-4, 6-7 (4-7), 6-0 असा संघर्षपूर्ण विजय मिळवित आगेकूच केली. दोनदा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या रोमानियाच्या 12 व्या मानांकित सिमोना हॅलेपनेही दुसरी फेरी गाठताना इटलीच्या कॅमिला जॉर्जीचा 6-4, 7-6 (7-3) असा पराभव केला. तिची पुढील लढत स्लोव्हाकियाच्या क्रिस्टिना कुकोव्हाशी होईल. कुकोव्हाने अमेरिकेच्या ऍन ली हिचे आव्हान 7-5, 6-1 असे संपुष्टात आणले. युक्रेनच्या इलेना स्विटोलिनानेही दुसरी फेरी गाठली असून तिने आर. मारिनोचा 6-2, 6-3 असा पराभव केला तर दारिया कॅसात्किनाने त्वेसाना पिरोन्कोव्हाला 6-2, 6-1 असा धक्का दिला.
मरे पराभूत, रुबलेव्ह विजयी
पुरुष एकेरीत तिसऱया मानांकित सित्सिपसने ब्रिटनच्या अँडी मरेवर पाच सेट्सच्या झुंजार लढतीत 2-6, 7-6 (9-7), 3-6, 6-3, 6-4 असा विजय मिळविला. चार तास 49 मिनिटे ही झुंज रंगली होती. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत होण्याची मरेची 15 सामन्यातील ही पहिलीच वेळ होती. या सामन्यावेळी सित्सिपसने प्रथम मेडिकल टाईमआऊट घेतले होते आणि नंतर बाथरूम ब्रेकसाठी बराच वेळ घेतल्यानंतर मरे संतप्त झाला होता. त्याने पंचांकडे तक्रारही केली. या मोठय़ा ब्रेकमुळे त्याची लय बिघडली आणि हा सामना मरेला गमवावा लागला. सित्सिपसची पुढील लढत फ्रान्सच्या ऍड्रियन मॅनारिनोशी होईल. रशियाच्या पाचव्या मानांकित आंद्रेय रुबलेव्हने 22 व्या मानांकित इव्हो कार्लोविकचा 6-3, 7-6 (7-3), 6-3 असा पराभव केला. मारिन सिलिक व फिलिप कोहलश्रेबर यांच्या लढतीत पाचव्या सेटवेळी सिलिकने माघार घेतल्याने फिलिपला पुढे चाल मिळाली.
किर्गिओस स्पर्धेबाहेर
अन्य एका सामन्यात स्पेनच्या रॉबर्ट बॉटिस्टा ऍगटने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला पहिल्याच फेरीत 6-3, 6-4, 6-0 असा पराभवाचा धक्का दिला. रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हनेही विजयी सुरुवात करताना फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटचा 6-4, 6-3, 6-1 असा पराभव केला. याशिवाय दिएगो श्वार्ट्झमनने बेरान्किसचा 7-5, 6-3, 6-3, ग्रिगोर डिमिट्रोव्हने एस. रिफाईसचा 6-3, 7-6 (7-2), 6-3 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. या स्पर्धेसाठी पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली असल्याने स्टेडियम फुल्ल भरले होते. पण प्रवेश देताना व्हॅक्सिन घेतल्याच्या दाखल्याची तपासणी करण्यासाठी वेळ लागल्याने सामने सुरू होण्यास थोडा विलंब झाला. त्याबद्दल तक्रार करण्यात आली. मात्र आयोजकांनी विलंबाचे कारण स्पष्ट केल्याने प्रेक्षकांनी व खेळाडूंनीही संयम राखत प्रतिसाद दिला.