रालोआ-महाआघाडी दोघांनाही फटका बसणार
वृत्तसंस्था/ सिवान
शहाबुद्दीनचा परिवार बडे साहब म्हणजेच लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राजदवर अत्यंत नाराज असल्याचे जगजाहीर आहे. लालूंचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी शहाबुद्दीनचे पुत्र ओसामाची भेट घेतल्यावरही निर्माण झालेले अंतर संपताना दिसून येत नाही. असउद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमच्या पाचही आमदारांनी ओसामाची भेट घेतल्यावर बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाने सीमांचलमध्ये 5 जागा जिंकून राजदला धक्का दिला होता. अल्पसंख्याक समुदायाला स्वतःकडे वळविण्यास ओवैसी यशस्वी ठरले आहेत. पण सीमांचलमधील जागांच्या मदतीने ओवैसी यांना बिहारच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळू शकत नाही. अशा स्थितीत ओसामा म्हणजेच शहाबुद्दीनचे पुत्र त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. सिवान आणि छपरा जिल्हय़ात आजही शहाबुद्दीनच्या परिवाराचा प्रभाव आहे. ओसामा सोबत आल्यास एआयएमआयएमला अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते मिळविण्यास मदत होऊ शकते.
ओसामाच्या समर्थनाची गरज
राजदपासून वेगळे होत राजकीय युद्धात फारसे उपयुक्त ठरणार नसल्याचे ओसामा जाणून आहेत. कारण सिवान व्यतिरिक्त सीमाचंलसारख्या जिल्हय़ांमध्ये अल्पसंख्याकांचे मुद्दे वेगळे आहे. जर ओसामा आणि ओवैसी एकत्र आल्यास महाआघाडी तसेच रालोआ व्यतरिक्ति त्यांची स्वतःची मतपेढी तयार होऊ शकते. तर शहाबुद्दीनच्या मृत्यूनंतर कमजोर पडलेल्या परिवाराला नवे बळ मिळू शकते. ही जोडी यशस्वी ठरल्यास राजदला मोठा झटका बसणार आहे. राजदचे कित्येक वर्षे जुने एमवाय समीकरण उधळले जाणार आहे.