ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत वाढत 10 हजारच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात आज सकाळी 88 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9832 वर पोहोचली आहे. त्यातील 5636 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आज आढळलेल्या 88 नव्या करोनाबाधितांमध्ये औरंगाबाद शहर हद्दीतील 42 व ग्रामीण हद्दीतील 40 जणांचा समावेश आहे. तर, सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये सहाजण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या, जिल्ह्यात 3819 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 377 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पुन्हा एकदा 18 जुलैपर्यंत कडकडीत लॉक डाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात संचारबंदी असून देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.