प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील आरोग्य मंदिर परिसरातील 4 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या औषध दुकानातील मंगळवारी घेण्यात आलेल्या उर्वरित 22 कर्मचाऱयांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान बुधवारी जिल्हय़ात नवे 22 कोरोनाबाधित आढळले असून एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंदिर येथील औषध दुकानामध्ये सुरूवातीला 2 आणि त्यानंतर पुन्हा 2 असे 4 कोरोना रूग्ण आढळले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्यानुसार मंगळवारी दुपारपासून दुकान बंद करण्यात आले. त्यानंतर दुकानातील उर्वरित 22 कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात आले होते. या सर्व कर्मचाऱयांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. त्यामुळे हे दुकान सुरू होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान याच औषद दुकानाच्या बसस्टँड परिसरातील दुसऱया शाखेतील 10 कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.
एकाचा उपचाराम्यान मृत्यू
रत्नागिरी जिल्हय़ात बुधवारी नवे 22 रूग्ण आढळून आले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 171 तर मृतांची संख्या 370 झाली आहे.