डिझेलवर चालणाऱया वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन ई-ऑटोटिप्पर खरेदी
प्रतिनिधी / बेळगाव
कचऱयाची उचल करताना डिझेलवर चालणाऱया वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ई-ऑटोटिप्पर खरेदी करण्यात आले आहेत. महानगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर दोन टिप्पर खरेदी केले असून सदर ई-ऑटोटिप्पर मनपाच्या कचरावाहू वाहन ताफ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे कचरा जमा करताना शहरात आता मनपाचे ई-ऑटोटिप्पर दिसणार आहेत.
शहर आणि उपनगरात घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते. याकरिता महानगरपालिकेने वाहने खरेदी केली आहेत. तर काही ठिकाणी भाडेतत्त्वावरील वाहनांची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा घेण्यासाठी वाहन शहरात फिरत असल्याने प्रदूषण होत असते. त्याचप्रमाणे इंधनाकरिता मोठय़ाप्रमाणात खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी महापालिकेच्या खजिन्यावर अर्थिक भुर्दंड वाढला आहे. तसेच कचऱयाची उचल करण्याकरिता ई-टिप्परचा वापर करण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. त्यामुळे घरोघरी जावून कचरा जमा करण्यासाठी ई-टिप्पर खरेदी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता. कचरा उचल करण्यासाठी घरोघरी जाणारी वाहने थांबत जात असतात त्यामुळे डिझेल वाहनांचे प्रदूषण वाढते. त्यामुळे प्रदूषण रोखण्याच्यादृष्टीने विजेवर चालणारी ई-ऑटोटिप्पर योग्य असल्याचे मत व्यक्त करून दोन ई-ऑटोटिप्पर खरेदी करण्याची सूचना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दोन ई-ऑटोटिप्पर खरेदी करण्यात आले आहेत.
प्रयोग यशस्वी झाल्यास आणखीन ई-ऑटोटिप्पर खरेदी
एक हजार वॅटच्या बॅटरीवर चालणाऱया ऑटोटिप्परची किंमत दोन लाखांपर्यंत आहे. सदर बॅटरी चार तास चार्जिंग केल्यास 80 किलोमीटर धावू शकते. एकदा बॅटरी चार्ज करण्याकरिता 5 रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर वाहन चालविण्याकरिता चालकाला वाहन परवान्याची आवश्यकता नाही. तसेच रोड टॅक्स भरण्याची गरज नाही. ई-ऑटोटिप्परमधून 400 किलो वजन वाहून नेता येते असे विविध फायदे असून ई-ऑटोटिप्परमुळे इंधनाकरिता करण्यात येणाऱया खर्चाची बचत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेल्या ई-ऑटोटिप्परचा प्रयोग यशस्वी झाल्यास आणखीन ई-ऑटोटिप्पर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.