प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही महिन्यांमध्ये चोरटय़ांनी ग्रामीण भागातील मंदिरे तसेच बंद घरे आणि दुकानांना लक्ष्य केले आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कडोली येथे मंदिरामध्ये चोरी झाल्यानंतर सोमवारी रात्री मुख्य रस्त्यावरील किराणा दुकान फोडून रोख 35 हजार आणि दुकानातील साहित्य असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
कडोली मुख्य रस्त्यावरील छत्रु महाराज मंगल कार्यालयात असलेल्या दुकानात ही चोरी झाली. पहाटे फिरायला गेलेल्या व्यक्तींना हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर या घटनेची माहिती दुकान मालक सुनील बाळेकुंद्री यांना कळविण्यात आली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती काकती पोलिसांना दिली.
चोरटय़ांनी दुकानातील 35 हजार रुपये रोख रक्कम, तिजोरीतील साहित्य चोरले आहे. तर दुकानात असणारे कपाट फोडून त्यामधील ऐवज लांबविला आहे. ते कपाट त्यानंतर चोरटय़ांनी शेतामध्ये फेकून दिले. या कपाटाबरोबरच दुकानात असलेले इतर साहित्यही चोरटय़ांनी पळविले आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
कडोली पंचक्रोशीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मागील महिन्यात चोरटय़ांनी बटाटय़ांवर डल्ला मारला होता. आता बंद घरे व दुकाने फोडत आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त घालावी आणि या चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.