प्रतिनिधी/ बेळगाव
गोव्याहून बेकायदा दारू वाहतूक करणाऱया दोघा जणांना बुधवारी पहाटे अबकारी अधिकाऱयांनी कणकुंबीजवळ अटक केली आहे. त्यांच्या जवळून वाहनांसह 11 लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून अबकारी विभागाने चार दिवसांत केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
राम कचरु करांडे (वय 26, रा. तोरटवाडी, जि. बीड), किरण कचरु करांडे (वय 23, रा. तोरटवाडी, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. एमएच 12, एफझेड 7164 क्रमांकाच्या टाटा गुड्स वाहनातून महाराष्ट्रात बेकायदा दारू नेताना ही कारवाई करण्यात आली आहे.
अबकारी विभागाचे संयुक्त आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त जयरामेगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक आर. बी. होसळ्ळी, सी. एस. पाटील, एम. सी. गलगली, श्रीकांत असुदे, राजू होसमनी, सुनील पाटील, के. बी. कुरहट्टी, बी. एस. अटगल, विठ्ठल कवरी, गुंडू पुजारी आदींनी ही कारवाई केली आहे.
पहाटे 4.45 वाजण्याच्या सुमारास अबकारी विभागाने गोव्याहून आलेले वाहन अडवून तपासणी केली. त्यावेळी 60 बॉक्स विस्की व 414.720 लिटर बिअर असा एकूण वाहनासह 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहन मालकालाही अटक करण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.