प्रतिनिधी / इचलकरंजी
कबनूर (ता.हातकणंगले) येथील संदीप मागाडे याचा निर्घृण खून करणाऱ्या केके गॅगचा म्होरक्या माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य कुमार कांबळे व त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी कबनूर ग्रामस्थांनी गुरूवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
हा मोर्चा कबनूर समाज भवनापासून प्रांत कार्यालयावर आल्यानंतर तेथे सभेत रुपांतर झाले. सभेत ग्रा.पं.सदस्य सुलोचना कट्टी व शोभा पोवार यांनी, संबंधित संशयित आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे मत व्यक्त केले. कबनूर ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कुमार कांबळे हा एका पक्षातून, तर सत्यम कांबळे हा त्याच्याविरोधात निवडणूक लढवित होता. सत्यम यांचा प्रचार संदीप मागाडे करीत असताना त्याला कुमार कांबळे याने प्रचार करू नये, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद मिटविण्याचे कारण सांगून आधीचा राग मनात धरत कुमार कांबळे व त्याच्या गँगने संदीप याचा खून केला. या निषेधार्थ कबनूर ग्रामस्थांनी मोर्चा काढला. मोर्चामध्ये प्रमोद पाटील, नितीन कामत, अभिजीत कांबळे, उमाजी पाटील, नारायण फरांडे, नेताजी कांबळे, सुहास कांबळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.