वार्ताहर/ टाळसुरे
कराड येथील तरुण अभियंत्याने दापोलीतील चंद्रनगर येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. प्रशात प्रकाश पवार (27, राहणार साकुर्डी ता. कराड, जि. सातारा) असे त्या अभियंतयाचे नाव आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील चंद्रनगर येथे सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास या अभियंत्याने आत्महत्या केल्याचे समजले. चंद्रकांत जगदाळे हे कामानिमित्त दापोलीला जात असताना दापोली-चंद्रनगर रस्त्यालगतच्या झाडाला अनोळखी व्यक्तीने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जगदाळे यांनी याची खबर दापोली पोलीस स्थानकात दिली. मृत व्यक्ती ही दापोलीतील नसून अनोळखी असल्याने त्याचा ठावठिकाणा समजून येत नव्हता.
त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात सुमारे तीन एटीएम कार्ड, पैसे, कराड ते दापोली असे बसचे तिकीट, मतदान कार्ड अशा वस्तू आढळल्या. या माहितीच्या आधारे संपर्क केला असता तो मूळचा कराड येथील असल्याचे समजले. प्रशात प्रकाश पवार (27, राहणार साकुर्डी ता. कराड, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. प्रशांत ने अभियंत्याचे शिक्षण पूर्ण केलेले होते. काही कामानिमित्त तो कोकणात आला असल्याचे समजले आहे. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.