प्रतिनिधी/ कराड
कराड, मलकापूरसह लगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ही साखळी निश्चितपणे तुटेल. यासाठी या कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या सर्व्हेमध्ये नागरिकांनी घरातील आजारी, लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कराड परिसरातील गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळल्याने 23 रोजी मध्यरात्रीपासून या कंटेनमेंट झोनमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना रूग्णांची मागील 14 दिवसांची ट्रव्हल, होम आणि वर्क हिस्ट्री घेण्यात येत आहे. त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. याद्वारे कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य विभागाकडून सर्व्हे सुरू आहे. सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास अशी लक्षणे दिसत असलेल्या सदस्याची माहिती सर्व्हे करणाऱया पथकाला द्यावी. माहिती लपवू नये. लपवल्यास आपल्याच कुटुंबाला भविष्यात धोका होऊ शकतो. तसेच घरात 60 पेक्षा जास्त वयाचे लोक असतील तर त्यांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, क्षयरोग किंवा एचआयव्ही बाधित कोणी असल्यास त्याचीही माहिती द्यावी. कोरोनाचा संसर्ग अशा लोकांना होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही दोन्ही प्रकारची माहिती सर्व्हे करणाऱया पथकाला द्यावी. कराडमध्ये कोरोनाची साखळी निश्चितपणे तुटेल. यासाठी लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.