एकुण 18 ठिकाणी लसीकरण
वार्ताहर / कराड
कराड तालुक्यात जेष्ठ नागरिक व 45 वर्षावरील इतर आजार असलेल्या शासकीय नियमाप्रमाणे लसीकरणास पात्र असलेल्या एकुण 1 लाख 12 हजार 361 लाभार्थांची नोंद आहे. गुरूवारअखेर यातील जवळपास 15 हजार 730 लाभार्थांना लसीकरण करण्यात आले आहे. कृष्णा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयासह तालुक्यातील 18 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जवळपास 14 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली.
सुरूवातीपासुनच कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यात गुरूवारअखेर एकुण 10162 रूग्णांची नोंद झाली आहे. यातील 9156 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 345 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 161 बाधितांवर अद्याप उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात असली तरी अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे. कराड शहरासह तालुक्यात आजही गर्दीचे कार्यक्रम होताना दिसत आहेत. रविवारी व गुरूवारी आठवडी बाजारच्या निमित्ताने मंडई परिसर व मुख्य बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून नागरिकांच्या बेफिकिरीचे दर्शन होत आहे. पोलीस व पालिकेने अधिक कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागातही लोक काळजी घेताना दिसत नाहीत. कृष्णा रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयासह तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरळीत सुरू आहे. यापूर्वी केलेल्या सर्व्हे नुसार शहरासह तालुक्यात शासनाच्या नियमाप्रमाणे लसीकरणासाठी पात्र असलेल्या लाभार्थांची संख्या 1 लाख 12 हजार 361 इतकी आहे. यातील 14 टक्के लाभार्थांना लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थांनाही लसीकरण करण्यात येत आहे.