प्रतिनिधी /कराड :
शहरात कोरोनाने विळखा घट्ट केला असून बुधवारच्या अहवालात कराडातील पोलीस दामप्त्य कोरोना बाधित झाले. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कर्मचारी व त्या कर्मचारी यांची वाहतूक शाखेत सेवा बजावणारी पत्नी यांचा समावेश आहे. दोघेही मार्च महिन्यापासून सातत्याने कर्तव्य बजावत आहेत.
दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अन्य एक पोलीस कर्मचारीही बाधित झाले आहेत. कोरोनाचा आकडा वाढल्यापासून कराडचे पोलीस कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर खडा पहारा देत पोलीस प्रसंगी नियम मोडणारांवर कारवाई करत आहेत. याच काळात कराड उपविभागातील 14 पोलीस कोरोना बाधित झाले. बुधवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील एक पोलीस कर्मचारी बाधित झाले. हे पोलीस कर्मचारी सातत्याने गुन्हेगारांवर कारवाई करणे, नोटीस बजावण्याची कार्यवाही करत होते. गणेशोत्सवापूर्वी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे पोलीस कर्मचारी प्रयत्नशील होते. याच पोलीस कर्मचाऱयाची पत्नीही कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्या वाहतूक शाखेत सेवा बजावतात. मार्च महिन्यापासून त्या महिला कर्मचारी रस्त्यावर बंदोबस्त करत आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अन्य एक पोलीस कर्मचारीही बाधित झाले आहेत.