प्रतिनिधी/ कराड
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कराडकर नागरिकांच्या सेवेसाठी रूग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय कराड नगरपालिकेने घेतला होता. फोर्स कंपनीची, सुमारे आठ प्रवासी क्षमतेची ही रूग्णवाहिका पालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या गाडीचे पूजन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते झाले.
गटनेते राजेंद्रसिंह यादव, सौरभ पाटील, विनायक पावसकर, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, आरोग्य सभापती महेश कांबळे, सुहास जगताप, गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, विद्या पावसकर, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नोडल ऑफिसर रफीक भालदार उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत कार्यात येणाऱया अडचणी, पावसाळय़ातील महापुराची स्थिती, पालिकेच्या अग्निशामक दलाकडून राबवण्यात येणाऱया उपाययोजना यासाठी रूग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय पालिका सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार ही रूग्णवाहिका नगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. कराडमध्ये शववाहिकाही नाही. त्यामुळे शववाहिकाही खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही शववाहिकाही पालिकेत लवकरच दाखल होणार आहे.
कराडमध्ये अनेक रूग्णालये, दवाखान्यांच्या तसेच खासगी रूग्णवाहिका आहेत. मात्र आपत्ती व्यवस्थापनावेळी ऐनवेळी गैरसोय नको, यासाठी पालिकेनेच स्वत:ची रूग्णवाहिका आणि शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रूग्णवाहिका पालिकेकडे दाखल झाली आहे. नगरपालिकेने शववाहिकाही खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर महापुरातील मदत कार्यासाठी दोन बोटीही खरेदी करण्यात येणार आहे. कराड पालिका कोरोनात सतर्कपणे काम करत आहे. रूग्णवाहिका दाखल झाल्यामुळे पालिकेस उपाययोजना राबवताना याची मदत होणार आहे.