डॉक्टर्ससाठी कोडं ठरलं प्रकरण : रुग्णात तरीही एकही लक्षण दिसले नाही
अमेरिकेत कोरोना महामारीचे चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. रक्ताच्या कर्करोगाच्या रुग्णात कोरोना विषाणू 70 दिवसांपर्यंत जिवंत राहिले, परंतु संसर्गाचे कुठलेच लक्षण दिसून आलेले नाही. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजने या प्रकरणाचे अध्ययन केले आहे. विषाणूतज्ञ विन्सेंट मुंस्टर यांच्यानुसार प्रारंभी रुग्णामध्ये किती दिवसांपासून विषाणूने तग धरला हे माहिती नव्हते.
अनेकदा पॉझिटिव्ह अहवाल
संबंधित रुग्णाचे वय 71 वर्षे असून वॉशिंग्टनच्या किर्कलँडची रहिवासी आहे. महिलेत महामारीच्या प्रारंभीच संक्रमण झाले होते. अनेकदा रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी झाली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला. सेल नियतकालिकात प्रकाशित अध्ययनानुसार एखाद्या माणसात कोरोना किती दिवसांपर्यंत राहू शकतो, हे स्पष्टपणे आतापर्यंत जाणून घेता आलेले नाही.
इम्युन सिस्टीम कमजोर
विषाणूतज्ञ विन्सेंट यांच्यानुसार रक्ताच्या कर्करोगामुळे रुग्णाची इम्युन सिस्टीम (रोगप्रतिकारकक्षमता) अत्यंत कमजोर झाली होती, तरीही कोविड-19 चे लक्षण दिसून आलेले नाही. रुग्ण ऍनिमियाला तोंड देत होती. रुग्णालयात नियमित कोविड चाचणीसाठी नाकातून नमुना घेतला जात होता. संबंधित रुग्ण महिलेची पहिली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह झाल्यावर तिच्यात सुमारे 70 दिवसांपर्यंत कोरोना स्पष्ट स्वरुपात राहिला आहे.
लक्षणे न दिसण्याचे कारण
रुग्ण दीर्घकाळापर्यंत संक्रमित राहिली कारण, इम्युन सिस्टीमने विषाणूचे संक्रमण झाल्यावरही कधीच प्रतिक्रिया दिलेली नाही. रक्तचाचणी अहवालानुसार महिलेत कधीच अँटीबॉडी तयार झालेली नाही. कोरोनातून बरे झाल्यावरही प्रकृतीत फारसा फरक पडलेला नाही, अशी माहिती विन्सेंट यांनी दिली आहे.