वैयक्तिक कर्ज देणाऱया कंपन्या-वेबसाईटचा समावेश : आयटी विभागाने दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुगलने व्यक्तीगत कर्जांशी संबंधीत असणाऱया जवळपास 100 ऍप्सना आपल्या प्लेस्टोअरवरुन हटविले आहे. यासंदर्भात बुधवारी संसदेला दिलेल्या माहितीनुसार सदरचे ऍप हे नियमांचे पालन करत नव्हते. तसेच ग्राहक आणि सरकारी एजन्सींनी या ऍपबाबत चिंता व्यक्त केली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे तत्काळ कर्जाच्या आमिषाने करण्यात आलेल्या फसवणुकी संदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या आधारावरच ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक व्याज वसुली आणि व्यक्तिगत माहितीचा दुरुपयोग केल्याच्याही तक्रारी दाखल केल्याची माहिती आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी एका लिखीत प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. या ऍपच्या आधारे कर्जावर अधिकचे व्याज आकारुन ते वसुल केले जात होते. यासंदर्भात विविध तक्रारी आल्यामुळेच ही कारवाई केल्याचे नमूद करण्यात आले.
गुगलकडून ऍप्स हटविण्यास प्रारंभ
गुगलने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काही कर्ज स्वरुपात रक्कम देणाऱया ऍप्स ना बाजूला करण्यास सुरुवात केली आहे.
आरबीआयकडे पडताळी पहावी
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्ज देणाऱया कोणत्याही लिस्टेड वेबसाईटवर किंवा ऍपवर गेल्यास आरबीआयकडे सदरचे कर्ज देणारे ऍप किंवा वेबसाईट नोंदणीकृत असल्याचे तपासून पहावे, या सोबतच हे ऍप एनबीएफसीसोबत काम करत आहे, की नाही तेही पडताळून पहावे. यातील देवाणघेवाण करणाऱया सर्व कंपन्यांवर त्यांची ओळख पटविण्याचे बंधन घालण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.