वार्ताहर/ मौजेदापोली
दापोलीतील इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच असल्याने दरवर्षी विद्यार्थ्यांकडून बनवले जाणारे आकाश कंदील यावर्षी शिक्षकांनीच बनवत त्यांनी कर्णबधीर विद्यालयाची परंपरा कायम राखली आहे.
दिवाळीच्या कालावधीत कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी आकाश कंदील, उटणे अशाप्रकारे साहित्य बनवतात व त्याची विक्री करतात. छोटय़ा आकाश कंदिलांना दापोलीतील पतसंस्था व इतर व्यक्तींकडून या शाळेकडे मागणी असते, परंतु यावर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. विद्यार्थी घरी असल्यामुळे आता आकाश कंदील मागणीनुसार कसे पुरवायचे, असा प्रश्न शिक्षकांपुढे उपस्थित झाल्यानंतर मुख्याध्यापिका व कलाशिक्षक सूर्यकांत खेडेकर, धोंडीबा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी छोटे 350, तर मोठे 40 ते 50 आकाश कंदील बनवले.
मात्र यातून येणारे पैसे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला वापरले जाणार आहेत. दरवर्षी विद्यार्थी अशाप्रकारचे कंदील, उटणे बनवून विक्री करायचे. आणि त्यातून येणारे पैसे विद्यार्थी कामात खर्चित करायचे, परंतु यावर्षी विद्यार्थी शाळेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनीच कंदील बनवून आपली विद्यार्थ्यांची परंपराच कायम राखली आहे. त्यामुळे शिक्षकांचे कौतुक होत आहे.