बेंगळूर/प्रतिनिधी
देशात येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्या दृष्टीने राज्य सरकार तयारी करत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी तयारी म्ह्णून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सोमवारी राज्यातील ११४ मागास तालुक्यांना ७९१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात येतील अशी माहिती दिली. गिव इंडिया फाऊंडेशनच्या वतीने सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटप करण्याची मोहीम सुरू करताना त्यांनी ही माहिती दिली आणि ते म्हणाले की, “साथीच्या आजाराच्या तिसर्या लाटेला तोंड देण्याच्या तयारीचा भाग म्हणून ११४ सर्वात मागास तालुक्यातील सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन केंद्रे दिली जातील. यामध्ये १०६ लिटर क्षमतेची ५५६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ५ लीटर क्षमतेसह २२६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा समावेश असेल.
यावेळी उपमुख्यमंत्री व राज्याचे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. सी.एन. अश्वथ नारायण म्हणाले, ‘२६ जून रोजी सुरू करण्यात आलेल्या आकांक्षा सीएसआर पोर्टल मार्फत आरोग्य विभागांच्या गरजा पूर्ण करत आहे. यासाठी २२९ कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली असून १३६ दानशूरांची नोंदणी केली आहे. या पोर्टलद्वारे आणि माहिती दिली की आतापर्यंत २१ प्रकारांची उद्दिष्टे गाठली गेली आहेत. फाऊंडेशनबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले की, आतापर्यंत ४७ कोटींची ऑक्सिजन केंद्रे दिली आहेत.