बेंगळूर/प्रतिनिधी
बुधवारी कर्नाटकमधील विविध जिल्ह्यात २,५८४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८,५३,७९६ वर पोहोचलो आहे. यापैकी ८,११,५८१ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत घरी परतले आहेत. दरम्यान राज्यात उपचारात असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ३०,७४३ इतकी आहे. बुधवारी राज्यात बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या २,८८१ होती. तर राज्यात बुधवारी एकूण २३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ११,४५३ लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. बेंगळूरमध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १७,३०६ आहे. बुधवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात १,६६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.