बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील एकूण २३ तालुके भूस्खलन प्रवण म्हणून ओळखले गेले आहेत, तसेच तज्ज्ञ समितीने जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीला बळकटी देण्याची व प्रतिबंधासंदर्भात कृती आराखडा तयार करण्याची शिफारस केली आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी सांगितले.
भूस्खलनग्रस्त भागांचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटक जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष अनंत हेगडे यांच्या नेतृत्वात गठित तज्ज्ञ समितीने गुरुवारी आपला अंतिम अहवाल बेंगळूर येथे मुख्यमंत्र्यांना सादर केला. या समितीने पश्चिम घाट व किनारपट्टीवरील असुरक्षित भागातील नद्या व दऱ्यांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच भूस्खलन रोखण्यासाठी अनेक महत्वपूर्ण वैज्ञानिक सूचना व मदत उपाय दिल्या आहेत, असे येडियुरप्पा म्हणाले.
भूस्खलन, मदत उपाय आणि पुनर्बांधणी रोखण्यासाठी समितीने अनेक शिफारसी केल्या आहेत, असे सीएमओने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निगरानी केंद्राने (केएसएनडीएमसी) राज्यातील २३ तालुके भूस्खलन प्रवण असल्याचे म्हंटले आहे. या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता आहे.
“समितीने जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीला बळकटी देण्याची शिफारस केली आहे. भूस्खलन रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचीही शिफारस केली आहे.” कर्नाटक सरकार या शिफारसींचे परीक्षण करेल आणि आवश्यक पावले उचलेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.