अमेरिकेहून परतलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्याच्या सहकाऱयालाही लागण : गुलबर्ग्यात आणखी चार संशयित रुग्ण
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 8 वर पोहोचली आहे. मागील आठवडय़ात अमेरिकेहून बेंगळूरला परतलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या सहकारी मित्रालाही कोरोनाची लागण झाली आहे. गुलबर्ग्यात कोरोना व्हायरसमुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलीला कोरानाची लागण झाल्याचे रविवारी सायंकाळी स्पष्ट झाले होते. दरम्यान या जिल्हय़ात व्हायरसचे आणखी चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
अमेरिकेहून बेंगळूरला आलेला सॉफ्टवेअर अभियंत्याला कोरोना व्हायरसची बाधा झाली होती. तो राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण होता. त्यापाठोपाठ त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलगी आणि निकटवर्तीयालाही कोरोनाची लागण झाली होती. आता त्याच्या संपर्कात आलेल्या कंपनीतील सहकाऱयालाही या व्हायरसची लागण झाल्याचे वैद्यकीत तपासणी अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 8 वर पोहोचली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारी 344 कोरोना संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी 32 वर्षीय रुग्ण एक पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्याच्यावर के. सी. जनरल इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य दोघांना स्वतंत्रपणे देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
गुलबर्ग्यात सौदी अरेबियाहून परतलेल्या 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ त्याच्या कुटुंबातील चौथ्या सदस्याला म्हणजेच मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे गुलबर्गा जिल्हय़ात सतर्कतेच्या सूचना देण्यात आली असतानाच आणखी चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
राज्य सरकारी कर्मचाऱयांची बायोमेट्रीक हजेरी बंद
दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारने खबरदारी म्हणून सरकारी कर्मचाऱयांना हजेरी नोंदीसाठी असणारी बायोमेट्रीक व्यवस्था बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. बेंगळूरमध्ये 5 आणि गुलबर्ग्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्याने सरकारी कर्मचाऱयांची बायोमेट्रक हजेरी 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे, कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याचे सचिव मुनिश मौदगिल यांनी हा आदेश दिला आहे.
विधानसभेतील प्रेक्षक गॅलरीही बंद
विधानसौधमध्येही कोरोनाविषयी सतर्कता बाळगण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र खबरदारी म्हणून 17 मे 20 मार्चपर्यंत स्पीकर गॅलरी आणि जनतेला प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी हा आदेश दिला आहे. आमदार आणि मंत्र्यांनी विनंती केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना व्हायसर वॉर रुम सुरू करणार
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘कोरोना व्हायसर वॉर रुम’ प्रारंभ करणे. तसेच तपासणी केंद्रे स्थापन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. विधानसौधमध्ये त्यांनी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केली. बैठकीत कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी हाती घेण्यात येणाऱया उपाययोजनांविषयी चर्चा केली आहे. हुबळी, हासन, गुलबर्गा, मंगळूरसह अनेक जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना व्हायरस वॉर रुम सुरू करण्यात येतील. प्रत्येक जिल्हय़ात हेल्थ डेस्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हय़ात इस्पितळांमध्ये 150 ते 250 स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात येईल. प्रत्येक दिवशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.