बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान राज्यातील आणि बेंगळूर शहरी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बेंगळूरमधील खासदार आणि आमदारांसह सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात कोविड -१९ प्रसार रोखण्यासंदर्भातचा निर्णय मंगळवारी घेण्यात येईल. दरम्यान सोमवारी बैठक संपताच, नवीन कोविड मार्गदर्शक तत्त्वांसह एक एक परिपत्रक व्हायरल झाले. यामध्ये दोन आठवड्यांचा लॉकडाऊन होणार असल्याचे म्हंटले होते. परंतु व्हायरल झालेले ते वृत्त आणि परिपत्रक खोटे असल्याचे समोर आले आहे.
कर्नाटकचे मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी हे परिपत्रक काढल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असून या परिपत्रकात २० एप्रिल रोजी सकाळी ९ पासून राज्य लॉकडाऊन होईल, हा लॉकडाऊन सोमवारी ३ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत असेल, असे म्हंटले आहे.
व्हायरल झालेले वृत्त कर्नाटक सरकारच्या लेटरहेडवर असल्याचे दिसत आहे. परंतु हे परिपत्रक फेक आहे. यावर मुख्य सचिवाद्वारे प्रसिद्ध केलेल्या दस्तऐवजावर सही नव्हती. तसेच सरकार किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत नोटीस किंवा माहिती मिळालेली नाही. त्यामुळे व्हायरल झालेले परिपत्रक खोटे आहे.