मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची केंद्र सरकारकडे विनंती : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी साधला संवाद
प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटकसह देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. देशात दिवसाला 3 लाख प्रकरणांची नोंद होत आहे. महाराष्ट्र, दिल्लीबरोबरच कर्नाटकातही मोठय़ा संख्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. परिणामी ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने राज्यासाठी दिवसाला 1,417 टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यामुळे इतक्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केंद्र सरकारकडून करण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केली आहे.
देशातील कोरोना स्थितीची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती व त्यावरील नियंत्रण यासंबंधी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. राज्याला अतिरिक्त ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवावा. राज्याला आवश्यक प्रमाणात रेमडेसिवीरचा साठा करणे शक्य होत नाही. पुढील 10 दिवसांत 2 लाख डोस इतकी रेमडेसिवीर औषध पुरवठा करावा, अशी विनंती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पंतप्रधानांकडे केली.
कर्नाटकाने अलिकडेच केंद्र सरकारकडे 7,667 डी टाईप ऑक्सिजन सिलिंडर्स व 64 ऑक्सिजन केंद्रे मंजूर करण्याची विनंती केली होती. यासंबंधी निर्देश देऊन राज्याला मागणीनुसार ऑक्सिजनसाठा पुरविण्यात यावा. 25 एप्रिलपासून राज्याला दररोज 1,142 टन ऑक्सिजन आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 30 एप्रिलपासून 1,471 टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे, असे येडियुराप्पा यांनी सांगितले आहे.
…तर गंभीर समस्या उद्भवेल
राज्यात गुरुवारी 500 टन ऑक्सिजनचा वापर झाला आहे. तर केंद्राने राज्याला केवळ 300 टन ऑक्सिजन पुरवठा केला आहे. मात्र, परिस्थिती अशीच राहिली तर समस्या आणखी गंभीर होईल. ऑक्सिजनचा योग्य वेळेत पुरवठा झाला नाही तर अनेक आरोग्य सेवा केंद्रे बंद करण्याची वेळ येईल, अशी वस्तूस्थितीही त्यांनी पंतप्रधानांसमोर मांडली.
राज्यात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देखील येडियुराप्पांनी मोदींना दिली. रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात बेडची व्यवस्था केली जात आहे. खासगी इस्पितळांकडूनही बेड मिळविण्यात आले आहेत. शिवाय कोविड केअर सेंटर आणि आयसीयु विभागाची क्षमताही वाढविण्यात येत आहे, असेही येडियुराप्पा यांनी सांगितले.